मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून मनुस्मृतीचे उदात्तीकरण हटवा, संभाजी बिग्रेडची कुलगुरुंकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 01:29 PM2022-07-18T13:29:13+5:302022-07-18T13:30:25+5:30
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी.ए. अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज व रामदास यांचे गुरू-शिष्य संबंध जोडून मनुस्मृतीच्या उदात्तीकरण केले आहे
संख : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी.ए. अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज व रामदास यांचे गुरू-शिष्य संबंध जोडून मनुस्मृतीच्या उदात्तीकरण केले आहे. हे अभ्यासक्रमातून तत्काळ हटवावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष श्रेयस नाईक यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, यशवंत चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या बी.ए. तृतीय वर्ष राज्यशास्त्राच्या १२ जुलै २०२२ च्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्र. २ (अ) मध्ये शिवाजी महाराजांच्या राजनीतिला समर्थ रामदासांनी केलेले योगदान सांगा तसेच प्रश्न क्र. ३ (ई) मध्ये मनुस्मृती या ग्रंथाचे सामाजिक महत्त्व स्पष्ट करा. हे प्रश्न विचारण्यात आले आहेत.
मुक्त विद्यापीठात भारतीय संविधान विरोधी अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांची भेटच झाली नसल्याचे अनेक इतिहास संशोधकांनी व दि.१६ जुलै २०१८ रोजीच्या औरंगाबाद खंडपीठाने निकालात नमूद केले आहे. असे असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्याविषयी लिहिलेल्या खोट्या इतिहासाला अभ्यासक्रमात स्थान दिले आहे. हा खोटा इतिहास लिहिणारी अभ्यासक्रम समिती रद्द करावी. प्रश्नपत्रिकेत विचारलेल्या प्रश्नांबाबत यशवंत चव्हाण मुक्त विद्यापीठाने जाहीर माफी मागावी. अभ्यासक्रमातील हा प्रश्न व चुकीचा इतिहास न हटवल्यास ब्रिगेडच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.