सांगलीत विद्युत खांबावरील फलक हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:29 AM2021-09-27T04:29:18+5:302021-09-27T04:29:18+5:30
सांगली : विद्युत खांबावरील डिजिटल फलकांच्या ठेक्याची मुदत संपली असतानाही ठेकेदाराने फलक लावले होते. रविवारी महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने राममंदिर ...
सांगली : विद्युत खांबावरील डिजिटल फलकांच्या ठेक्याची मुदत संपली असतानाही ठेकेदाराने फलक लावले होते. रविवारी महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने राममंदिर ते कर्मवीर चौकादरम्यान विद्युत खांबावरील फलक काढून जप्त केले.
मुदत संपूनही होर्डिग्ज ठेक्याबाबत महापालिकेकडून चालढकल असे वृत्त दोन दिवसांपूर्वी लोकमतने प्रसिद्ध केले होते. होर्डिग्ज ठेक्याची मुदत मार्चअखेर होती. ती संपल्यानंतरही विद्युत विभागाने नवीन ठेका काढला नाही. त्यातच ठेकेदाराने विद्युत खांबावर बेकायदा फलक लावले होते. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले. याबाबत आयुक्त नितीन कापडणीस यांनी गंभीर दखल घेत ठेकेदारावर कारवाईचे आदेश दिले होते. मालमत्ता विभागाने ठेकेदाराविरुद्ध विश्रामबाग पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे.
दरम्यान, शनिवारपासून ठेकेदाराने स्टेशन चौकातील विद्युत पोलवरील फलक काढून घेतले. राममंदिर ते कर्मवीर चौक या रस्त्यावर मात्र अजूनही फलक होते. महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने रविवारी ते जप्त केले. याचवेळी ठेकेदारानेही काही फलक काढून घेतले. ठेकेदाराने मुदतवाढीसाठी महापालिकेकडे अर्ज केला होता. पण त्या अर्जावर सात महिन्यात निर्णय झाला. पालिका अधिकाऱ्यांच्या आंधळ्या कारभारामुळे महापालिकेला मोठा फटका बसला आहे.