सांगलीत महापुराची चर्चा ठरतेय निर्णायक, ना प्रचारात रंगत ना रणधुमाळी; -: फेरफटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 12:13 AM2019-10-18T00:13:22+5:302019-10-18T01:06:50+5:30
पण पुरावेळी देण्यात येणारा दैनंदिन भत्ता अजूनही मिळाला नसल्याची आठवणही करून दिली. त्याचवेळी वसंत कांबळे यांनी मात्र, मुद्द्याला हात घालत कोणीच प्रश्नावर बोलत नसल्याची खंत व्यक्त केली.
शरद जाधव ।
सांगली : सांगलीचा पुढचा आमदार कोण, हे ठरविण्यासाठीच्या मतदानासाठी अवघे चार दिवस उरले असताना, मतदारसंघात मात्र शांतताच आहे. ना कुठे जाहीर सभा, ना कुठे रॅली. कुठे तरी सुरू असलेला ध्वनिक्षेपकावरील प्रचार इतकीच काय ती प्रचाराची यंत्रणा! मतदार, ‘आश्वासनांचे नको, तर मुद्द्याचे बोला’ यावर ठाम असल्याचे दिसून आले. कृष्णाकाठावर पुराच्या आठवणी आणि झालेली ससेहोलपट यावर मतदार पोटतिडकीने मते मांडताना दिसून आले.
विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे चार दिवस उरल्याने सांगली मतदारसंघात प्रचाराची रंगत अनुभवण्यासाठी फेरफटका मारला असता, शहरातील काही भाग वगळता कुठेही विधानसभा निवडणूक सुरू असल्याचे दिसून आले नाही. दुपारी चारच्या सुमारास बुधगावमध्ये प्रचाराच्या गाड्या फिरत असल्या तरी, सर्वत्र शांतताच होती. काही प्रचार वाहने एकाच ठिकाणी थांबून होती. वेळ दुपारची असल्याने कदाचित कुठेही प्रचारासाठी कार्यकर्ते बाहेर पडल्याचे दिसून आले नाही. बुधगाव-माधवनगर मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असली तरी, कुठेही प्रचारासाठी यंत्रणा फिरत असल्याचे दिसले नाही.
दिवस मावळतीला जात असतानाच, निसर्गरम्य हरिपुरात प्रवेश केला. जाताना शहरात दोन ठिकाणी रॅली सुरू होती. हरिपुरातही जोरात प्रचार सुरू असेल, असा अंदाज बांधत प्रवेश केला, तर संपूर्ण गाव पिंजूनही, कुठेही ना प्रचार सुरू होता ना रॅली. अगदी प्रचार करणाऱ्या वाहनांचाही पत्ता नव्हता. त्यामुळे संपूर्ण गाव तिन्हीसांजेला शांततेत बुडाले होते.
कृष्णा-वारणा संगमाकडे मोर्चा वळविला असता, मावळतीला चाललेल्या सूर्याच्या साक्षीने ग्रामस्थांचा गप्पांचा फड चांगलाच रंगला होता. सुनील पवार यांनी निवडणुकीचे वातावरण इतके ‘थंड’ का आहे, याचे विश्लेषण करत थेट कोणाची बाजू ‘जड’ आहे, हेच सांगून टाकले. पण पुरावेळी देण्यात येणारा दैनंदिन भत्ता अजूनही मिळाला नसल्याची आठवणही करून दिली. त्याचवेळी वसंत कांबळे यांनी मात्र, मुद्द्याला हात घालत कोणीच प्रश्नावर बोलत नसल्याची खंत व्यक्त केली. कर्नाटकात ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये पेन्शन असताना, महाराष्टÑात एक हजारच का? असा सवाल केला. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यात येत नसल्याचेही त्यांनी सांगितले. हाच मुद्दा उचलत आनंदराव भोई म्हणाले, वय वाढेल तसे प्रकृतीच्या अडचणी असतात, औषधोपचार सुरू असतात, मग समाधानकारक पेन्शन मिळायलाच हवी. वेळ सायंकाळची असल्याने अंकलीत प्रचार रंगला असणार, अशी अपेक्षा असताना, संपूर्ण गाव फिरूनही कुठेही निवडणुकीचा मागमूसही दिसून आला नाही. यावर भाऊसाहेब पाटील यांच्याशी संवाद साधला असता, निवडणूक काय घेऊन बसलाय, माणसे अजूनही पुराच्या कटू आठवणीतून बाहेर पडली नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आदगोंडा पाटील यांनीही पुरावेळची नुकसान भरपाई न मिळाल्याने नाराज असल्याचे सांगितले. अंकलीतून सांगलीच्या दिशेने येतानाही कुठेही प्रचार नसल्याने, सांगली मतदारसंघात नक्की निवडणूक आहे ना? हाच प्रश्न पडावा, असे नीरस वातावरण होते.
जनतेची ताकद : मोठी
हरिपुरातील ग्रामस्थांनी, गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकाच पक्षाची सत्ता असल्याने निर्णय अपेक्षित असल्याची भावना व्यक्त केली. शेजारच्या कर्नाटकात मुलीच्या जन्मानंतर लाख रुपये दिले जातात; मात्र आपल्यात चर्चाही नाही. तिथे वीजबिल माफ केले आहे आणि इथे पुरानंतरही दुपटीने बिल आल्याचे सांगत, दोन्ही एकाच पक्षाची सरकारे असताना असा दुजाभाव नको, अशी अपेक्षाही ग्रामस्थांनी व्यक्त केली.
भरपाईबद्दलचा मुद्दा : शेतातील कामे उरकून नेहमीप्रमाणे गप्पांत सामील व्हायला आलेल्या गणेश कांबळे यांनी पुराचा मुद्दा काढून, शेतीचे नुकसान होऊनही अद्याप भरपाई मिळाली नसल्याचे सांगितले. त्यानंतर सर्वांनीच पुराचे अनुभव, मदत आणि अद्यापही न मिळालेली मदत आदी मुद्दे मांडले. यशवंत गवळी यांनीही, दुकानातील शिलाई यंत्राचे नुकसान झाले आहे; मात्र मदत अद्याप मिळाली नसल्याचे सांगितले.
हरिपूर (ता. मिरज) येथील कृष्णा-वारणा नदीच्या संगमाजवळील घाटावर जमलेल्या नागरिकांमध्ये गुरुवारी निवडणुकीच्या चर्चेला उधाण आले होते.