मिरजेतून ५३९ स्लॅबच्या प्लेटा जप्त : खुनाचा बनाव करणारा संतोष पवार पसारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 10:49 PM2018-12-03T22:49:55+5:302018-12-03T22:50:19+5:30
सांगली : कर्नाळ रस्त्यावर खुनाचा बनाव करणाऱ्या कुरुंदवाड (ता. शिरोळ) येथील संतोष जाधव याच्या दोन साथीदारांना अटक करण्यात संजयनगर ...
सांगली : कर्नाळ रस्त्यावर खुनाचा बनाव करणाऱ्या कुरुंदवाड (ता. शिरोळ) येथील संतोष जाधव याच्या दोन साथीदारांना अटक करण्यात संजयनगर पोलिसांना सोमवारी यश आले. त्यांच्याकडून ५३९ स्लॅबच्या प्लेटा जप्त केल्या आहेत. या प्लेटा त्यांनी मिरजेत भंगार विक्रेत्याकडे ठेवल्या होत्या.
अमित साताप्पा गोंधळी (वय २५) व अविनाश साताप्पा गोंधळी (२०, दोघे रा. तेरवाड, ता. शिरोळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघेही सख्खे भाऊ आहेत. गेल्या आठवड्यात कर्नाळ रस्त्यावर सावर्डेकर यांच्या शेताजवळ एक बेवारस दुचाकी सापडली होती. दुचाकीवर रक्ताचे डाग आढळले होते. तसेच एक पिशवी होती. त्यामध्ये संतोष जाधव नावाचे पॅनकार्ड सापडले होते. हा प्रकार पाहून खून झाल्याची अफवा पसरली होती.
प्रसारमाध्यमातून याचे वृत्त प्रसिद्ध होताच, बांधकाम व्यावसायिकांनी संजयनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पॅनकार्ड सापडलेली संतोष जाधव ही व्यक्ती कुरुंदवाडची असल्याचे सांगितले. तसेच त्याने स्लॅबच्या प्लेटा भाड्याने नेऊन त्यांची परस्पर विक्री केल्याचे सांगितले. याप्रकरणी रमेश खरमाटे (अभयनगर) व नागेश माने (कुपवाड) यांनी फिर्याद दिली होती. दोघांच्या अनुक्रमे नऊशे व सहाशे प्लेटा त्याने भाड्याने नेल्या होत्या. त्या परतही केल्या नाहीत व भाडेही दिले नव्हते.
गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागताच संतोष जाधव पसार झाला. त्याचे साथीदार अमित व अविनाश या दोघांशी संपर्क करुन, त्यांना बोलावून घेण्यात आले. त्यानंतर त्यांना अटक केली.
चौकशीत त्यांनी संतोष जाधव याच्या सांगण्यावरुन ५३९ प्लेटा मिरजेत भंगार विक्रेत्याकडे ठेवल्याचे सांगितले. पोलीस निरीक्षक प्रताप पोमण, सहायक निरीक्षक काकासाहेब पाटील यांच्या पथकाने सोमवारी दुपारी भंगार विक्रेत्याकडे छापा टाकून ५३९ प्लेटा जप्त केल्या. फरार संतोष जाधव याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
चार दिवसांची पोलीस कोठडी
अटकेत असलेल्या गोंधळी बंधूंना सोमवारी दुपारी न्यायालयात उभे करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना ६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. दोघांची कसून चौकशी सुरु आहे. फरार असलेला संतोष जाधव सापडल्यानंतर तपासाला आणखी गती मिळेल, तसेच प्लेटाही जप्त करण्यात यश येईल, असे तपास अधिकारी काकासाहेब पाटील यांनी सांगितले.