ऐतवडे बुद्रुकमध्ये स्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट डाळीचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:27 AM2021-05-06T04:27:57+5:302021-05-06T04:27:57+5:30
ऐतवडे बुद्रुक येथील स्वस्त धान्य दुकानातून अंत्योदय केशरी आणि दारिद्र रेषेखालील शिधापत्रिकांवर एक किलो हरभरा डाळीचे मोफत वितरण सुरू ...
ऐतवडे बुद्रुक येथील स्वस्त धान्य दुकानातून अंत्योदय केशरी आणि दारिद्र रेषेखालील शिधापत्रिकांवर एक किलो हरभरा डाळीचे मोफत वितरण सुरू आहे.
स्वस्त धान्य दुकानातून वितरित केलेली डाळ दक्षता समितीच्या निदर्शनास शिधापत्रिकाधारकांनी आणून दिली. ही डाळ निकृष्ट असून, गुरांना टाकण्याजोगी आहे. डाळीचा दर्जा खालावलेला असताना, त्यात किडलेल्या डाळीचे प्रमाण, तसेच खड्यांचेही प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती असून, जनतेकडून रोष व्यक्त केला जात आहे.
शासनाच्या मोफत धान्य वितरण योजनेंतर्गत लाभार्थ्यांना डाळीचे वितरण केले जात आहे. याचा आम्हाला पुरवठा विभागाकडून प्राप्त झालेल्या डाळीची वितरण होत असून, आदेशाप्रमाणे आम्हाला वाटप करणे बंधनकारक आहे, असे धान्य दुकानदारांनी सांगितले.
ग्रामस्थांची लोकप्रतिनिधींकडे तक्रार
स्वस्त धान्य दुकानात निकृष्ट डाळीचे मोफत वाटप होत असल्याने गावातील शिधापत्रिकाधारकांना ही डाळ वाटप करण्यात आली. शिधापत्रिकाधारकांनी आमदार मानसिंगराव नाईक यांच्याकडे तक्रार केली, तसेच दक्षता कमिटीने याची पाहणी केली. तत्काळ निकृष्ट डाळ शिधापत्रिकाधारकांना वाटू नका, असे सांगून तसे दक्षता कमिटीने त्यांना लेखी पत्र दिले आहे.
चौकट...
स्वस्त धान्य दुकानात वितरित केलेली खराब डाळ संबंधित दुकानदारांना तत्काळ बदलून द्या, असे आमदार मानसिंगराव नाईक यांनी वाळवा तहसीलदारांना सांगितले आहे. तशा सूचना तहसीलदारांनी पुरवठा विभागाला दिल्या आहेत.
चौकट...
पहिली जुनी डाळ खराब होती. ती डाळ संबंधित दुकानदारांना वाळवून वाटप करण्यास सांगितली होती. महाराष्ट्रात वाटपाचे आदेश नसल्याने जास्त दिवस डाळ गाेदामामध्ये राहिली. त्यामुळे ती खराब झाली आहे. यापुढे चांगल्या दर्जाचे धान्य देण्यात येईल, असे पुरवठा अधिकारी बबन करे यांनी सांगितले.