रखडलेले दाखल्यांचे गतीने वितरण

By admin | Published: April 8, 2017 12:00 AM2017-04-08T00:00:56+5:302017-04-08T00:00:56+5:30

‘लोकमत’च्या वृत्ताने खळबळ : इस्लामपूरमध्ये नागरिकांतून समाधान

Delivery of speed of certificates issued | रखडलेले दाखल्यांचे गतीने वितरण

रखडलेले दाखल्यांचे गतीने वितरण

Next



इस्लामपूर : येथील ‘महसूल विभागाच्या प्रशासकीय इमारतीमधील सेतू कार्यालयातून दिल्या जाणाऱ्या महसूलच्या दाखल्यांना लिपिकाकडून ‘ब्रेक’ असे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिध्द होताच गेल्या महिन्याभरापासून रखडलेले दाखले शुक्रवारी गतीने वितरित करण्यात आले. ‘लोकमत’च्या या वृत्ताने महसूल विभागात खळबळ उडाली होती.
येथील सेतू कार्यालयातून उत्पन्न, राष्ट्रीयत्व, नॉन क्रिमीलेअर, जात, शेतकरी, शेतमजूर, अल्पभूधारक अशा दाखल्यांसह अनेक प्रकारची प्रतिज्ञापत्रे नागरिकांना करुन दिली जातात. या सर्व सुविधा एकाच छताखाली मिळत असल्याने, तालुक्यातील नागरिकांची या सेतू कार्यालयात मोठी गर्दी असते. दिवसभरात जवळपास १०० हून अधिक दाखल्यांची पूर्तता या कार्यालयातून केली जाते. हे दाखले तहसीलदारांच्या अधिकृत स्वाक्षरीसाठी पाठवले जातात. तेथे असणारे लिपिक सुनील साळुंखे हे दाखल्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबी तपासून तहसीलदारांच्या डिजिटल स्वाक्षरीने दाखला निर्गत करीत असतात. मात्र गेल्या महिन्याभरापासून विविध प्रकारचे दाखले देण्याचे काम रखडले होते. जे नागरिक भेटण्यासाठी येतील, त्यांचेच दाखले साळुंखे यांच्याकडून दिले जातात, अशा तक्रारी वाढल्या होत्या. गुरुवारी ‘लोकमत’ प्रतिनिधीने या सर्व बाबींची प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन खातरजमा केल्यानंतर, जवळपास २०० हून अधिक दाखले देण्याचे काम प्रलंबित असल्याचे समजले. नागरिकांच्या सोयीसाठी असणारी ही व्यवस्था नागरिकांनाच नडवत असल्याने ‘लोकमत’ने त्यावर प्रकाशझोत टाकला. या वृत्तामुळे खडबडून जाग्या झालेल्या महसूल यंत्रणेने शुक्रवारी हे प्रलंबित दाखले सोडण्याचे काम केले.
त्यानंतर सेतू कार्यालयातून या दाखल्यांच्या मूळ प्रती नागरिकांना वितरित करण्यात आल्या. ‘लोकमत’च्या या वृत्ताबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
कृषी राज्यमंत्र्यांच्या तालुक्यात सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांची विविध दाखल्यांसाठी परवड सुरु आहे. महसूल यंत्रणेच्या मनमानी कारभारामुळे सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांची विविध दाखल्यांसाठी येथील तहसील कार्यालयात ससेहोलपट होत आहे.
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून सरकारात आहेत. त्यांच्या तालुक्यात सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांची दाखल्यासाठी पिळवणूक सुरु आहे. जो नागरिक भेट घेईल त्यालाच दाखला मिळतो, अशी येथील तससील कार्यालयाची नवी व्यवस्था लिपिक सुनील साळुंखे याने निर्माण केली आहे. लाल दिव्याच्या गाडीतून शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून फिरणारे कषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. (वार्ताहर)

Web Title: Delivery of speed of certificates issued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.