५० हजार क्विंटल बियाणांची मागणी
By admin | Published: June 7, 2016 10:57 PM2016-06-07T22:57:11+5:302016-06-08T00:10:57+5:30
जिल्ह्यात खरिपाची तयारी : वीस हजार टन खत, १५ हजार क्विंटल बियाणांचा पुरवठा
सांगली : जिल्ह्याचे खरीप हंगामाचे तीन लाख ३६ हजार ६५० हेक्टर क्षेत्र असून, यासाठी एक लाख ४० हजार टन खत आणि ५० हजार क्विंटल बियाणांची मागणी कृषी विभागाने केली आहे. यापैकी वीस हजार २९० टन खत आणि १५ हजार ५६८ क्विंटल आवक झाली आहे. मान्सूनपूर्व पाऊस चांगला झाला असून, येत्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्यास शेतकरी पेरणीला सुरुवात करणार आहेत. शिराळा तालुक्यात भाताची धूळवाफेवर पेरणी झाली आहे. वाळवा तालुक्यात सोयाबीन टोकणीस सुरुवात झाली आहे.
खरीप हंगामाचे जिल्ह्याचे उद्दिष्ट यापूर्वी सरासरी तीन लाख २८ हजार ३०० हेक्टर होते. यामध्ये ३८ हजार ३५० हेक्टरने यावर्षी वाढ झाल्याचे कृषी विभागाकडील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. चारशे हेक्टरने भाताचे क्षेत्र वाढले आहे. तुरीचे दर वाढल्याचा परिणाम जिल्ह्यातही झाल्याचे दिसत आहे. पूर्वी तुरीचे १२ हजार हेक्टर क्षेत्र होते. यामध्ये चक्क सात हजार हेक्टरची वाढ होऊन १९ हजार हेक्टर क्षेत्र झाले आहे. मूग, उडीद, भुईमुगाचे क्षेत्र दोन ते अडीच हजार हेक्टरने वाढले आहे. २०१४-१५ च्या खरीप हंगामामध्ये सोयाबीन पिकाचे ६३ हजार २०० हेक्टर क्षेत्र होते. यामध्ये दहा हजार हेक्टरची वाढ झाली आहे. मका पीक तात्काळ पदरात पडत असून पैसेही मिळवून देत आहे. त्यामुळे दुष्काळी मिरज पूर्व, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, तासगाव, खानापूर तालुक्यातील शेतकरी मका पिकाकडेही वळल्याचे दिसत आहे. मका लागवडीचे पूर्वी १४ हजार ५०० हेक्टर क्षेत्र होते.
यामध्ये तिप्पट क्षेत्र वाढून ३४ हजार हेक्टर झाले आहे. खरीप हंगामातील वाढत्या क्षेत्राचा विचार करूनच जिल्हा परिषद कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी खते, बियाणांचीही मागणी वाढविली आहे. युरिया, अमोनियम सल्फेट, डी.ए.पी., एम.ओ.पी., एस.एस.पी., सी.ए.एन., एस.ओ.पी., अशा एकूण एक लाख ४० हजार ५०० टन खताची मागणी केली आहे. त्यापैकी वीस हजार २९० टन खत जिल्ह्यात उपलब्ध झाले आहे. भात, ज्वारी, बाजरी, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल, मका आदी पिकांच्या ५० हजार २३८ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. त्यापैकी १५ हजार ५६८ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे.
शेतकऱ्यांना योग्य दरात खत पुरवठा होण्यासाठी ११ भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. यातूनही बियाणे व खतांची बोगसगिरी करणारे आढळून आले, तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हा परिषद कृषी विभागाचे कृषी विकास अधिकारी आर. जे. भोसले यांनी दिला आहे. गतवर्षी दुष्काळ पडल्याने शेतकऱ्यांना आता कर्ज पुरवठ्यावर अवलंबून रहावे लागत आहे. येत्या आठवड्यात चांगला पाऊस झाला तर पेरणीला सुरुवात होणार आहे. (प्रतिनिधी)
बोगसगिरी करणाऱ्यांवर फौजदारी - भोसले
जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामाचे क्षेत्र वाढले आहे. विशेषत: तूर, मूग, मका क्षेत्र वाढल्यामुळे त्या बियाणांची जादा मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आणखी बियाणे व खतांची मागणी करणार नाही. शेतकऱ्यांना योग्य दरात खत पुरवठा होण्यासाठी ११ भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. यातूनही बियाणे व खतांची बोगसगिरी करणारे आढळून आले, तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हा परिषद कृषी विभागाचे कृषी विकास अधिकारी आर. जे. भोसले यांनी दिला आहे.