प्राणी, पक्ष्यांना त्रास देणाऱ्या छायाचित्रकारांवर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:19 AM2021-06-06T04:19:45+5:302021-06-06T04:19:45+5:30
मिरज : प्राणी, पक्ष्यांना नाहक त्रास देऊन फोटो, व्हिडीओसाठी त्यांच्या नैसर्गिक अधिवासात अतिक्रमण करुन वन्यप्राण्यांच्या मुक्तसंचारावर गदा आणणाऱ्या ...
मिरज : प्राणी, पक्ष्यांना नाहक त्रास देऊन फोटो, व्हिडीओसाठी त्यांच्या नैसर्गिक अधिवासात अतिक्रमण करुन वन्यप्राण्यांच्या मुक्तसंचारावर गदा आणणाऱ्या छायाचित्रकार, यू ट्यूबर व इतरांवर कारवाईची मागणी पिपल फॉर अनिमल्सने राज्याचे मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. वन्यजीव छायाचित्रकार व यू ट्यूबर यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
या तक्रारीत म्हटले आहे की, काही वन्यजीव छायाचित्रकार हे सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी तसेच स्पर्धेत बक्षीस मिळवण्यासाठी असे बेकायदा कृत्य करत आहेत. काही यू ट्यूबर जनजागृतीच्या नावाने प्राणी, साप, पक्ष्यांची अंडी, पिल्लांच्या अगदी जवळ जाऊन फोटो, व्हिडीओ घेत आहेत. मानवी हस्तक्षेपामुळे वन्य पक्षी धोक्यात आले आहेत. लोणावळ्यात परदेशातून येणारे अमूर फाल्कन पक्षी विश्रांतीसाठी थांबले असताना, या पक्ष्यांचे फोटो, व्हिडीओ काढण्यासाठी काही छायाचित्रकार, यू ट्यूबर धाव घेत आहेत. यामुळे प्राणी, पक्ष्यांना नाहक त्रास होऊन त्यांच्या नैसर्गिक अधिवासावर अतिक्रमण होत आहे. वन्यप्राण्यांच्या मुक्त संचारावर गदा येत आहे. म्हणून असे फोटो, व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तींविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम व जैवविविधता अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी पीपल फाॅर ऑनिमलचे कायदेशीर सल्लागार अॅड. बसवराज होसगौडर यांनी केली आहे. याबाबत नियमावली तयार करून त्याची प्रत सर्व जिल्ह्यांतील वन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, वन्यप्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्थांना देण्यात यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.