सांगली महापालिका आयुक्तांवर कारवाईची मागणी; काँग्रेस, किसान सभेचे निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 04:18 PM2024-08-20T16:18:43+5:302024-08-20T16:19:03+5:30
गडचिरोली येथील प्रकल्पात घोटाळा
सांगली : गडचिरोलीत प्रशिक्षणार्थी कालावधीत आदिवासींच्या गाय वाटप प्रकल्पात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे विद्यमान आयुक्त शुभम गुप्ता यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस तसेच किसान सभेने केली आहे.
काँग्रेसचे शहर जिल्हा सरचिटणीस आशिष कोरी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली. ते म्हणाले की, चौकशी समितीने शासनाला दिलेल्या अहवालात गुप्ता यांच्यावर गंभीर ताशेरे ओढण्यात आले आहेत. प्रकल्पातील घोटाळ्याबाबत त्यांना दोषी धरण्यात आले आहे. या अहवालाची दखल घेत शासनाने त्यांची तातडीने हकालपट्टी करावी. तसेच कडक कारवाई करावी.
भाजपचे गडचिरोली येथील आमदार डॉ. देवराव होळी यांनी दोन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे तसेच शासनाकडे गुप्ता यांच्याबद्दल तक्रार केली होती. भाजप आमदारांनी केलेल्या तक्रारीची दखल न घेता भाजपच्याच पालकमंत्र्यांनी अशा अधिकाऱ्याला पाठबळ का दिले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
किसान सभेकडून चौकशीची मागणी
अखिल भारतीय किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष कॉ. उमेश देशमुख यांनी गुप्ता यांच्या विरोधात राज्यपाल, उपमुख्यमंत्री तसेच संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे की, गडचिरोलीतील गायवाटप घोटाळ्यानंतर शुभम गुप्ता यांची धुळे जिल्हा परिषदेतील कारकीर्दही वादग्रस्त ठरली होती. त्याठिकाणच्या सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता. आता त्यांची नियुक्ती सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या आयुक्तपदी झाली आहे. त्यामुळे त्यांच्या काळात झालेल्या सर्व योजना व कामांची चौकशी करण्यात यावी. त्यात काही दोष आढळल्यास तातडीने कारवाई करण्यात यावी.