जादा दराने वस्तूंची विक्री करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:24 AM2021-05-15T04:24:49+5:302021-05-15T04:24:49+5:30
कामेरी : येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील प्रेरणा फाउंडेशन सेवाभावी संस्था यांच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवणे, जादा दराने जीवनावश्यक ...
कामेरी : येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील प्रेरणा फाउंडेशन सेवाभावी संस्था यांच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवणे, जादा दराने जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी व रेशन दुकानातील विक्रीव्यवस्थेतील त्रुटींमध्ये सुधारणा करावी. यासाठी वाळवा व शिराळा येथील तहसीलदार यांना ऑनलाइन निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात, कोविड-१९ च्या जागतिक महामारीमध्ये सर्वस्तरातील लोकांचे जीवनमान खालावले आहे. विशेषत: गरजू व आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या लोकांना लॉकडाऊनमुळे रोजगार नाही. त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. शेती व शेतमजुरी करणाऱ्यांची परिस्थितीही गंभीर बनली आहे. अशातच रेशन दुकानातून मागणीपेक्षा पुरवठा कमी होत आहे. तरी जीवनावश्यक वस्तूंवरचे (तांदूळ, गोडेतेल, तूरडाळ, चनाडाळ इत्यादी ) दर हे परिस्थितीनुसार न वाढवता स्थिर करावेत, दर्शनी बाजूस वस्तूंच्या दराचे फलक लावण्यात यावेत. तसेच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची तालुका पुरवठा अधिकारी पथकांनी तपासणी करून त्यांचावर कडक कारवाई करावी. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर रेशन दुकानामध्ये कार्डधारकांच्या अंगठ्याच्या ठशाचा आग्रह न धरता रजिस्टर मेंटेन करून दुकानदाराला धान्य वितरित करण्याची परवानगी दयावी. या मागण्यांचा विचार करून तातडीने संबंधित विभागांना तसे आदेश द्यावेत व योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी प्रेरणा फाउंडेशन सेवाभावी संस्थेचे सचिव सचिन यादव यांनी केली आहे.