मिरज पूर्व भाग सावकारीच्या विळख्यात-: सावकार व एजंटावर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 12:14 AM2019-01-24T00:14:06+5:302019-01-24T00:29:53+5:30
मिरज पूर्व भागात खासगी सावकारांंकडून शेतकºयांचे कर्ज वसुलीच्या नावाखाली शोषण केले जात आहे. शेतजमीन विकून कर्ज फेडले तरी, सावकारांकडून कर्जाच्या वसुलीचा तगादा सुरूच राहिल्याने तालुक्यातील मालगाव येथे
मालगाव : मिरज पूर्व भागात खासगी सावकारांंकडून शेतकºयांचे कर्ज वसुलीच्या नावाखाली शोषण केले जात आहे. शेतजमीन विकून कर्ज फेडले तरी, सावकारांकडून कर्जाच्या वसुलीचा तगादा सुरूच राहिल्याने तालुक्यातील मालगाव येथे एका बागायतदार शेतकºयाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणावरून बेकायदेशीर सुरू असलेल्या सावकारीचा फास शेतकºयांच्या गळ्याभोवती अधिकच घट्ट होऊ लागल्याचे दिसत आहे. शेतकरीही सावकारांच्या दहशतीने तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. त्यामुळे प्रशासनाने बेकायदेशीर खासगी सावकारीवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
मिरज पूर्व भागातील शेतकरी म्हैसाळ जलसिंचन योजनेमुळे उभारी घेऊ लागला आहे. योजनेच्या पाण्याच्या जोरावर द्राक्षबाग, फळशेती, विविध पालेभाज्या यांसारखे प्रयोग करून कुटुंबाचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी येथील शेतकरी प्रयत्न करीत आहे. येथे द्राक्षबागांनी शेतकºयांना तारले आहे. परिसरात द्राक्षबागांचे प्रमाण मोठे आहे. मात्र पावसाची अवकृपा, बदलत्या हवामानामुळे द्राक्षबागांवर येणारी रोगराई, त्यातून बागा वाया जाऊन होणारे आर्थिक नुकसान, यामुळे बँकांकडून घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड होऊ शकली नाही. पुढील द्राक्ष हंगाम घेण्यासाठी लागणारी औषधे, मजुरांचा खर्च तसेच औषधांची थकीत बिले भागविण्यासाठी शेतकºयांना पुन्हा पैशाची गरज भासू लागली आहे. थकीत कर्जामुळे बँका कर्जे देत नाहीत, बँका तयार झाल्या तरी कागदपत्रांचा ताप नको यासाठी शेतकरी खासगी सावकाराकडून उसने पैसे घेण्यासाठी पळापळ करू लागला आहे. शेतकºयाची अडचण ओळखून खासगी सावकार याचा गैरफायदा घेण्यासाठी पुढे सरसावले आहेत.
मिरज पूर्व भागात कवठेमहांकाळ, सांगली, मिरज व मालगाव येथील अनेक खासगी सावकारांनी एजंट नेमून त्यांच्याकरवी कर्ज देण्याची पद्धत अवलंबली आहे. सावकार व एजंटांनी कमी व्याज दराची भुरळ घातल्याने अनेक शेतकरी सावकारी पाशात अडकले आहेत. सध्या त्यांना या कर्जाच्या पाशातून बाहेर पडणे अशक्य झाले आहे.
सावकार व एजंटांनी प्रथम कमी दराने कर्ज देण्याचे आश्वासन दिले. मात्र प्रत्यक्षात ही कर्जे दहा ते पंधरा टक्क्याने पठाणी पध्दतीने सावकार वसूल करू लागले आहेत. शेतकºयांनी कर्जाची प्रामाणिकपणे फेड करूनही सावकार वसुलीचा तगादा लावत असल्याने, शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
पैशासाठी सावकारी तगाद्याने एका शेतकºयाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खासगी सावकारीची प्रकरणे चव्हाट्यावर येत आहेत. खासगी बेकायदेशीर सावकारी करणाºयांनी कर्जासाठी शेतकºयांच्या जमिनी तारण, मुदत खरेदी, गहाणवट अशा पद्धतीने लिहून घेतल्या आहेत. काही शेतकºयांच्या जमिनी वसुलीच्या नावाखाली सावकारांनी बळकाविल्याच्याही तक्रारी आहेत.
बचत गटांना पैसे : नवा फंडा?
मिरज पूर्व भागातील अनेक गावांमध्ये काहींनी बचत गटांना आर्थिक पुरवठा करून सावकारी सुरु केल्याची चर्चा आहे. शेतकºयांनी घेतलेले कर्ज फेडूनही दुबार वसुलीचे तंत्र सावकारांनी सुरु केल्याने काही शेतकºयांवर गाव सोडण्याची वेळ आली आहे, तर काही शेतकºयांचे मानसिक संतुलन बिघडल्याने तेआत्महत्येसारख्या अघटित घटनेकडे वळत आहेत. त्यामुळे खासगी सावकारांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
कर्जाच्या नावाखाली गहाणवट दागिने हडप
मिरज पूर्व भागात खासगी व बेकायदेशीर सावकारीने शेतकरी भरडला जात आहे. पठाणी व्याज आकारणी व कर्जाची परतफेड करूनही सर्वसामान्यांपासून शेतकºयांपर्यंत सर्वांनाच दुबार कर्ज वसुलीने हैराण करुन सोडले आहे. गहाणवट दागिनेही कर्जाच्या नावाखाली हडप केले जात आहेत. त्रस्त शेतकरी खासगीत कारवाईची मागणी करू लागल्याने, एका सामाजिक संघटनेकडून सावकारांची व एजंटांची नावे थेट जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीसप्रमुखांना देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.