नेर्ले प्राथमिक आरोग्य केंद्रात द्वितीय अधिकाऱ्यांची नेमणुकीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:27 AM2021-04-27T04:27:40+5:302021-04-27T04:27:40+5:30
नेर्ले : सध्याची कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता नेर्ले (ता. वाळवा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे द्वितीय वैद्यकीय अधिकाऱ्याची व रिक्त ...
नेर्ले : सध्याची कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता नेर्ले (ता. वाळवा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे द्वितीय वैद्यकीय अधिकाऱ्याची व रिक्त असणाऱ्या पदांवरील सेवकांची तातडीने नेमणूक करावी, अशी मागणी आपत्ती व्यवस्थापन समितीने केली आहे.
आरोग्य केंद्राचा नावलौकिक आहे. या आरोग्य केंद्राला अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राकडे प्रारंभापासून बाह्यरुग्ण विभागाकडे प्रतिदिन सुमारे १५० रुग्णांची तपासणी होत असते. याबरोबरच अॅन्टिजन, आरटीपीसीआर चाचणी करणे, पॉझिटिव्ह रुग्णांच्यामध्ये सौम्य लक्षणे असतील तर त्यांना गृह अलगीकरणात ठेवणे याबरोबरच त्यांना औषधोपचार करणे, कामांचा ताण गेल्या वर्षभरापासून वैद्यकीय अधिकारी यांच्यावर आहे. गेल्या सात महिन्यांपासून द्वितीय वैद्यकीय अधिकारी रजेवर असल्याने हा संपूर्ण कामाचा ताण प्रथम वैद्यकीय अधिकारी यांच्यावर पडत आहे.
आरोग्य केंद्राकडे सुमारे नऊ सेवकांची पदे रिक्त आहेत. उपलब्ध असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्याही वाढत आहे. आरोग्य केंद्रांतर्गत एकूण ३८३ रुग्णापैकी ३३० रुग्ण गृह अलगीकरणात बरे झाले आहेत. केंद्रांतर्गत लसीकरणाचे एकूण लाभार्थी ९६३७ असून ९० टक्के लसीकरणाचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर शिंदे यांनी दिली.
गतवर्षी कोरोना विषाणूच्या पहिल्या लाटेमध्ये आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वतीने लोकवर्गणीतून ५ ऑक्सिजन बेडची उभारणी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये करण्यात आली. या सुविधेचा असंख्य रुग्णांनी आतापर्यंत लाभ घेतलेला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांच्या घराबाहेर गृह अलगीकरणाचा फलक लावण्याचे काम ग्रामपंचायत व आरोग्य केंद्राच्या वतीने शंकर माने व भिकू खोत करीत आहेत. एक मेनंतर १८ वर्षे वयावरील सर्वांना लस देण्याचे काम चालू होणार आहे. यावेळी कामाचा ताण अधिक वाढणार आहे. अशावेळी रिक्त जागेवर अधिकारी व कर्मचारी नेमणे गरजेचे आहे.
वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर शिंदे, भिकू खोत, ज्योती कुलकर्णी, सी. ए. खंडाईत अण्णा साळुंखे, संगीता कांबळे, अपर्णा खोत, बापू पारधी, वंदना कारंडे, मेजर उथळे आदीं सहआरोग्य सेवक, ग्रामपंचायत नेर्ले, तलाठी, पोलीस पाटील, आपत्ती व्यवस्थापन समिती व कासेगाव पोलीस परिश्रम घेत आहेत.