लाडेगाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्या नेमणुकीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:22 AM2021-07-17T04:22:14+5:302021-07-17T04:22:14+5:30
वशी : लाडेगाव येथे जिल्हा परिषदेची पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे. शाळेत एकूण ४ शिक्षक होते. परंतु त्यापैकी ...
वशी : लाडेगाव येथे जिल्हा परिषदेची पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे. शाळेत एकूण ४ शिक्षक होते. परंतु त्यापैकी एक शिक्षिका सेवानिवृत्त होऊन व दोन शिक्षक प्रमोशनवर जाऊन गेले एक ते दीड वर्ष झाले आहे. त्यामुळे शाळेत एकच शिक्षक राहिला आहे. शिक्षक भरण्याची मागणी वेळोवेळी निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी वाळवा तसेच शिक्षणाधिकारी जि. प. सांगली यांच्याकडे केली आहे.
लाडेगाव (ता. वाळवा) येथील जि. प. शाळेला सर्व शिक्षा अभियानमधून ५ लाख ९० हजार रुपये मंजूर असून पंचायत समिती सदस्य पी. टी. पाटील यांनी १ लाख शाळा दुरुस्तीसाठी व जिल्हा परिषदेकडून शौचालय दुरुस्तीसाठी ८८ हजार रुपये मंजूर झाले आहेत. सद्यस्थितीला पत्रा बदलण्याचे काम चालू आहे. येत्या १ ते २ महिन्यामध्ये सर्व कामे पूर्ण होऊन लाडेगाव जि. प. शाळेचा चेहरामोहरा बदलणार आहे. त्याचबरोबर क्रीडांगण सपाटीकरणाचे काम झाले असून शाळेच्या चारही बाजूने वृक्ष लागवडीचे नियोजन केले आहे. त्याचबरोबर शाळेला कंपाऊंड नसल्यामुळे कुंपणाची मागणी शिक्षक आ. जयंत आसगावकर यांच्याकडे केली आहे. त्यामुळे लाडेगाव जि. प. शाळेला भाैतिक सुविधा कमी पडणार नाहीत.
जि. प. शिक्षक भरती न झाल्यास सर्वसामान्यांची समजली जाणारी ही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. अशामुळे सर्वसामान्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. त्यासाठी लवकरात लवकर शिक्षकांची पदे शासनाने त्वरित भरावीत, अशी मागणी सरपंच रणधीर पाटील यांनी केली आहे.