भिडे, एकबोटेंच्या अटकेचे धाडस दाखवा संभाजी ब्रिगेडची मागणी : कोरेगाव-भीमा येथील घटनेचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 01:04 AM2018-01-07T01:04:02+5:302018-01-07T01:04:02+5:30
सांगली : कोरेगाव-भीमा येथील दंगलप्रकरणी संभाजीराव भिडे व मिलिंद एकबोटे यांना अटक करण्याचे धाडस प्रशासनाने दाखवावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, कोरेगाव-भीमा व वढू-बुद्रुकमध्ये झालेल्या जातीय हिंसाचाराचा संभाजी ब्रिगेड निषेध करीत आहे. छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्याबद्दल व त्यांच्या कार्याबद्दल ब्रिगेडला आदर आहे. मनोहर (संभाजीराव) भिडे व मिलिंद एकबोटे यांनी संपूर्ण महाराष्टÑात इतिहासाची मोडतोड करुन मराठा समाजाच्या तरुणांची माथी भडकावण्याचा उद्योग केल्याने दंगलसद्दश परिस्थिती निर्माण झाली, हे कोणीही नाकारु शकत नाही.
शिवशाहीच्या हुंकारातून पेशवाईचा जीर्णोद्धार करण्याचा महाराष्टÑात व देशामध्ये जो प्रयोग सुरू आहे, त्याचा ब्रिगेड निषेध करीत आहे. शिवरायांना अपेक्षित असणारे अठरापगड जातीचे समतावादी शिवस्वराज्य उभारणीसाठी तसेच मराठा-दलित आणि हिंदू-मुस्लिम सलोख्यासाठी ब्रिगेडचा प्रयत्न राहील. मराठा सेवा संघाच्या प्रबोधनामुळे मराठा व बहुजनांची मुले आता खरा इतिहास वाचू लागली आहेत.
पत्रकारवर जिल्हाध्यक्ष सुयोग औंधकर, कार्याध्यक्ष प्रणव भोसले, कोषाध्यक्ष गणेश देसाई, सचिव बाळासाहेब लिपाणे-पाटील, कायदा सल्लागार डॉ. महेश पाटील यांच्या सह्या आहेत.
जनतेचा विश्वास उडाला..
अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असलेले संशयित प्रसारमाध्यमांना बेधडक मुलाखती देत आहेत. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिसप्रमुख त्यांच्यासमोर हात जोडत आहेत. तरीही गृहमंत्रीपद सांभाळणारे मुख्यमंत्री संशयितांना अटक करण्याचे धाडस दाखवित नाहीत. त्यामुळे घटनेप्रमाणे राज्य चाललंय यावर जनतेचा विश्वास उडाला आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.