सांगलीत प्रचाराची रणधुमाळी थंडावली : उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन; उद्या मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 09:05 PM2018-07-30T21:05:19+5:302018-07-30T21:05:48+5:30

Demand for campaigning in Sangli: demonstration of candidates; Voting tomorrow | सांगलीत प्रचाराची रणधुमाळी थंडावली : उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन; उद्या मतदान

सांगलीत प्रचाराची रणधुमाळी थंडावली : उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन; उद्या मतदान

Next
ठळक मुद्देमहापालिका निवडणूक

सांगली : महापालिकेच्या निवडणुकीसाठी महिनाभर सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी सोमवारी सायंकाळी थंडावली. पदयात्रा, कॉर्नर सभा, वाद्यांचा दमदणाट व फटाक्यांच्या आतषबाजीने प्रत्येक प्रभागातील गल्ली-बोळ दुमदुमून गेले. समारोपाच्या रॅलीतून उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन केले. प्रचाराची सांगता झाली असली तरी, पडद्याआडून छुप्या घडामोडींना सुरुवात झाली आहे.

सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी २० प्रभागांतून ७८ जागांसाठी ५४१ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामध्ये प्रमुख राजकीय पक्षांतर्फे एकूण ३४५ उमेदवार रिंगणात असून १९६ अपक्षही नशीब अजमावत आहेत. या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्टÑवादीने आघाडी केली असून भाजप, शिवसेना, जिल्हा सुधार समिती, स्वाभिमानी विकास आघाडीसह इतर पक्ष स्वतंत्ररित्या लढत आहेत.

सोमवारी सायंकाळी जाहीर प्रचाराची सांगता झाली. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांसह उमेदवारांनीही जोरदार शक्तिप्रदर्शन करीत प्रचाराचा समारोप केला. गल्ली-बोळातून उमेदवारांनी प्रचारफेऱ्या काढल्या. पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या रॅलींनी संपूर्ण शहर दणाणून गेले होते. प्रभागाचा विस्तार मोठा असल्याने उमेदवारांनी सकाळी दहापासूनच रॅलीला सुरुवात केली. गल्ली-बोळातून रॅली जात असताना उमेदवारांच्या नावांचा जयघोष केला जात होता. फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. ज्या भागातून रॅली जाणार नाही, तेथे रिक्षांवरील ध्वनिक्षेपकावरून प्रचार सुरू होता. आता जाहीर प्रचाराच्या समाप्तीनंतर छुप्या प्रचाराला वेग आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात झाली आहे. पाठिंबा न दिलेल्या भागात जाऊन मतदारांना वळविण्यासाठी लपून-छपून गाठीभेटी घेतल्या जात आहेत. उमेदवारांनी पै-पाहुण्यांनाही मदतीला घेतले आहे.

झेंडे, फलक गायब
जाहीर प्रचाराच्या समारोपानंतर सायंकाळी ध्वनिक्षेपक लावून फिरणाºया वाहनांसह संपर्क कार्यालयाबाहेर लावलेले फलक, झेंडे तातडीने काढण्यात आले. दुपारनंतर शहरातील निवडणुकीचे वातावरण थंड झाले होते. प्रत्येक गल्ली-बोळात फिरणाºया रिक्षा बंद झाल्याने प्रभागात शांतता जाणवत होती.

शक्तिप्रदर्शनामुळे वाहतुकीचा बोजवारा
अखेरचा दिवस शक्तिप्रदर्शनाचा असल्याने प्रत्येक प्रभागात लांबच्या लांब, डोळ्यांचे पारणे फेडणाºया पदयात्रा निघाल्याने शहरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे पोलीस यंत्रणेसह कार्यकर्ते वाहतूक सुरळीत करण्यात व्यस्त होते.

पदयात्रेत नेतेही सहभागी
उमेदवारांनी प्रभागात काढलेल्या पदयात्रेत राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही भाग घेतला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सकाळपासून विविध प्रभागांचा दौरा करीत होते. पालकमंत्री सुभाष देशमुख, भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगली, कुपवाडला, तर आ. सुरेश खाडे, आ. सुरेश हाळवणकर, कुडचीचे आ. पी. राजू, माजी आमदार रमेश शेंडगे यांनी मिरजेतील पदयात्रेत, काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम, सतेज पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील, प्रतीक पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, शिवसेनेचे खा. गजानन कीर्तीकर, संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील सांगली-मिरजेतील पदयात्रेत सहभागी झाले होते. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चित्रा वाघ, माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनीही प्रचार समारोपाच्या दिवशी नागरिकांशी संवाद साधला.

 

Web Title: Demand for campaigning in Sangli: demonstration of candidates; Voting tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.