सीआयडी चौकशीची मागणी
By admin | Published: December 24, 2015 12:14 AM2015-12-24T00:14:15+5:302015-12-24T00:36:16+5:30
पेपरफुटी प्रकरण : जि. प. स्थायी समितीत पोलीस उपअधीक्षकांचा निषेध
सांगली : जिल्हा परिषद आरोग्य सेविका पद परीक्षेतील पेपरफुटीची सीआयडीमार्फत चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशा मागणीचा ठराव जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत करण्यात आला. तसेच जि. प. पदाधिकाऱ्यांबद्दल पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी चुकीचे विधान केल्याचाही सभेत निषेध करण्यात आला.
जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सदस्य व पदाधिकाऱ्यांनी पेपर फुटीच्या प्रकरणाचा अधिकाऱ्यांना जाब विचारला. तुम्हीच परीक्षा पारदर्शक होत असल्याचे सांगत असताना, पेपर कसा फुटला, अधिकाऱ्यांना सोडून तुम्ही काही कर्मचाऱ्यांवर हे प्रकरण लादत आहात, असा आरोप करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच पेपरफुटी प्रकरणाचा लवकर तपास करा आणि दोषी अधिकाऱ्यांना यातून बाहेर काढू नका, अशी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड यांच्याकडे मागणी केली होती. असे असताना गायकवाड यांनी ‘पदाधिकारी काय म्हणतात, याला आम्ही किंमत देत नाही’ असे उदगार काढून पदाधिकाऱ्यांची बदनामी केली आहे. या प्रकरणाचा आम्ही निषेध करीत आहोत, असा ठराव सदस्यांनी मांडला. त्यानुसार तो ठराव मंजूर करून शासनाकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती रेश्माक्का होर्तीकर व सदस्य रणधीर नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
तसेच पेपरफुटी प्रकरणाचा सीआयडीमार्फत तपास करून दोषी अधिकाऱ्यांचा शोध घेऊन पेपर फोडणाऱ्यांचे रॅकेट बाहेर काढण्याच्या मागणीचाही ठराव करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष दिले नाही, तर राज्य शासनाकडे दाद मागण्यात येईल, असा इशाराही होर्तीकर यांनी दिला.
या सभेला जिल्हा परिषद उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, सभापती गजानन कोठावळे, पपाली कचरे, उज्ज्वला लांडगे, मनीषा पाटील, माजी अध्यक्ष देवराज पाटील, सदस्य फिरोज शेख, संजीवकुमार सावंत, अलकादेवी शिंदे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील यांच्यासह खातेप्रमुख व गटविकास अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शिक्षकांची रिक्त पदे : आंतरजिल्हा बदलीने भरा
जिल्ह्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये २७१ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. यामुळे अनेक शाळांवर शिक्षक कार्यरत नसल्यामुळे तेथील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. म्हणून आंतरजिल्हा बदलीने अन्य जिल्ह्यातून सांगलीत येणाऱ्यांना नियुक्ती देऊन रिक्त जागा भरण्याची सूचना सदस्यांनी केली. त्यानुसार तसा ठराव मंजूर करण्यात आला.