वीज कनेक्शन तोडणी बंद करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:24 AM2021-03-20T04:24:06+5:302021-03-20T04:24:06+5:30
करगणी : महावितरणने सक्तीने वीज बिल वसुली सुरू करून शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याचा लावलेला सपाटा त्वरित बंद करावा, अन्यथा ...
करगणी : महावितरणने सक्तीने वीज बिल वसुली सुरू करून शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याचा लावलेला सपाटा त्वरित बंद करावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार सचिन मुळीक यांना रासपचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण सरगर, उमाजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या देशभरात महागाई वाढत आहे. शेतीमालाचे पडलेले बाजारभाव आणि कोरोनामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अनेक छोटे-मोठे व्यावसायिक आर्थिक पेचात सापडले आहेत. अनेक व्यवसाय, दुकानेही लॉकडाऊन काळात बंद होती. बारा बलुतेदार, अठरापगड जातींच्या व्यावसायिकांची दुकाने बंद असतानाही लॉकडाऊन काळातील वाढीव, भरमसाट दराने आलेली वीजबिले अन्यायकारक आहेत. सध्या शेतकऱ्यांच्या रानात पिके आहेत. त्यांच्या विहिरीला पाणी आहे. मात्र महावितरणने वीज कनेक्शन बंद केल्याने त्यांनी काय करायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे वीज बिल वसुली थांबवून ज्या शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे वीज कनेक्शन तोडले आहे, ते पुन्हा जोडावे, अशी मागणी केली आहे.
यावेळी विशाल सरगर, कालिदास गाढवे, विकास वाक्षे, अजित कटरे, सुहास सरगर, सत्यजित गलांडे, विकास सरगर, अक्षय खोत, समाधान चौगुले, अरुण झंजे, शरद झंजे, समाधान घुटुकडे आदी उपस्थित होते.