काँग्रेसचा उमेदवार जाहीर करण्याची मागणी
By admin | Published: July 17, 2014 11:27 PM2014-07-17T23:27:59+5:302014-07-17T23:39:26+5:30
मिरजेतील बैठकीत निर्णय : अन्यथा कार्यकर्तेच उमेदवार निवडणार
मिरज : मिरज विधानसभा मतदार संघातील अकरा जिल्हा परिषद गटातून २२ काँग्रेस कार्यकर्त्यांची समिती विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त करण्याचा निर्णय तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच काँग्रे्रसने आठ दिवसात उमेदवार जाहीर करावा, अन्यथा कार्यकर्तेच उमेदवार जाहीर करुन कामाला लागतील, असा इशाराही पक्षनेत्यांना देण्यात आला.
विधानसभा निवडणुका जवळ आल्या तरी उमेदवार निश्चित नसल्याने मिरज मतदार संघात काँग्रेसइच्छुकांत जोरदार चुरस व परस्परांवर कुरघोड्या सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील, माजी सभापती अनिल आमटवणे, अण्णासाहेब कोरे, सोनीचे सरपंच दिनकर पाटील, राजू कोरे, म्हैसाळचे अनिल कबुरे, सलगरेचे तानाजी पाटील, खंडेराव जगताप, वसंतराव गायकवाड, आर. आर. पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश देसाई, पंचायत समिती सदस्य दिलीप बुरसे, बी. के. कांबळे, राजेंद्र बरगाले, निवासबापू पाटील, रावसाहेब बेडगे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. पक्षाचा उमेदवार जाहीर करण्यापासून प्रत्यक्ष निवडणुकीत भाजपच्या पाडावासाठी समिती पूर्ण ताकदीने प्रयत्न करेल, असेही बैठकीत निश्चित करण्यात आले.
मतदार संघातील प्रत्येक गावातून एक, असे ४७ प्रतिनिधी निवडण्यात आले. या प्रतिनिधींतून ११ जिल्हा परिषद गटातून प्रत्येकी दोन, अशा २२ कार्यकर्त्यांची समिती निवडण्यात येणार आहे. निवडण्यात आलेले बावीस प्रतिनिधी शहरातील नेत्यांशी चर्चा करुन मतदार संघात काँग्रेसचा उमेदवार निश्चित करुन त्याच्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत. (वार्ताहर)