फडणवीसांवर गुन्हा दाखलची मागणी निंदनीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:28 AM2021-04-20T04:28:06+5:302021-04-20T04:28:06+5:30
सांगली : ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकांना भेटण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्याबद्दल माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा ...
सांगली : ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकांना भेटण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्याबद्दल माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी निंदनीय आहे. पोलीस ठाण्यात एखाद्याला भेटायला जाणाऱ्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यातून सर्वसामान्यांमध्ये चुकीचा संदेश जाईल, असे मत जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकांना भेटण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले होते. यावरून सत्ताधारी पक्षांनी काहूर उठवले आहे. वास्तविक एखाद्याला पोलीस ठाण्यात बोलावल्यानंतर त्याला भेटायला गेलेल्यांची बाजू ऐकून घेतली पाहिजे. फडणवीस माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते आहेत. शासन चालवण्याचा अनुभव असणाऱ्या फडणवीसांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप करणे घृणास्पद आहे.
ते म्हणाले की, या प्रकरणात फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी चुकीची आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील प्रगल्भ राजकारणी आहेत. त्यांनी अशा कारवाईपूर्वी विचार करावा. असा गुन्हा दाखल झाला तर सर्वसामान्यांमध्ये चुकीचा संदेश जाईल. सर्वसामान्य लोक दाद मागण्यासाठी पोलीस ठाण्यात जाण्यास घाबरतील. पोलीस ठाण्यात कोणी जाऊच नये, असे सरकारला वाटते का? यातून पोलिसांच्या हातात कारवाईचे आणखी एक शस्त्र दिल्यासारखे होईल. त्यांच्यावर कोणाचाच अंकुश राहणार नाही.