पुसेसावळीत प्रक्षोभक पोस्ट व्हायरल करणाऱ्यावर कारवाईची मागणी, सांगलीत हिंदू एकताचे आंदोलन
By संतोष भिसे | Published: October 7, 2023 04:20 PM2023-10-07T16:20:28+5:302023-10-07T16:21:09+5:30
सांगली : पुसेसावळी (जि. सातारा) येथील दंगलीमध्ये काही तरुणांनी विशिष्ट हेतूने प्रक्षोभक पोस्ट समाजात व्हायरल केल्या. त्यांना शोधून कडक ...
सांगली : पुसेसावळी (जि. सातारा) येथील दंगलीमध्ये काही तरुणांनी विशिष्ट हेतूने प्रक्षोभक पोस्ट समाजात व्हायरल केल्या. त्यांना शोधून कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी हिंदू एकता आंदोलन संघटनेने केली. सांगलीत शनिवारी स्टेशन चौकात धरणे आंदोलन केले. यामध्ये माजी आमदार नितीन शिंदे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष विष्णूपंत पाटील, परशुराम चोरगे, शिवाजीराव दुधाळ आदी सहभागी झाले.
शिंदे म्हणाले, भावना दुखावणाऱ्या पोस्ट काही तरुणांनी हेतूपुरस्पर व्हायरल केल्या. त्याची स्वाभाविक प्रतिक्रिया उमटली. पोस्ट व्हायरल करणाऱ्यांनी पोलिस कोठडीतून बाहेर आल्यावरही पुन्हा तोच प्रकार केला. त्यामुळे यामागील कटकारस्थान आणि दूषित हेतू स्पष्ट दिसतो. त्यांना शोधून पोलिसांनी पुन्हा कारवाई केली पाहिजे. पण सातारा पोलिसांची कारवाईदेखील पक्षपाती दिसते. कोणाच्या तरी दबावाखाली येऊन गुन्हे दाखल केले आहेत. याविरोधात आम्ही शासनाकडे दाद मागू.
जिल्हाध्यक्ष विष्णूपंत पाटील म्हणाले, या तरुणांच्या मागे कोणती संघटना आहे याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे. निर्दोष तरुणांना सोडले पाहिजे. त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत. गुन्हेगार तरुणांना दंगलीच्या काळात कोण आश्रय दिला. त्यांची वकीलपत्रे कोणी घेतली याचीही चौकशी व्हायला हवी. तरुणांवर पक्षपाती कारवाया सुरूच राहिल्या, तर सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येण्याची भिती आहे.
आंदोलनात कलगोंड पडसलगे, शिवसेनेचे महेंद्र चंडाळे, प्रकाश चव्हाण, संकेत जाधव, अशोक पाटील, अमोल गवळी, अमर माने, महेश ऐतवडे, सूर्यकांत शेगणे, संदीप ताटे, तानाजी चव्हाण, सोमनाथ गोटखिंडे, राहुल जाधव आदी सहभागी झाले.