Sangli News: अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी, गर्भवती महिला वनरक्षकाचे वन कार्यालयासमोर उपाेषण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 12:03 PM2023-03-01T12:03:01+5:302023-03-01T12:03:26+5:30
वरिष्ठ अधिकारी वन कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देतात. हा त्रास बंद झाला पाहिजे
कुपवाड : कर्मचाऱ्यांना अकारण त्रास देणारे शिराळा येथील वनक्षेत्रपाल सचिन जाधव व इस्लामपूरचे वनपाल सुरेश चरापले यांना निलंबित करावे, या मागणीसाठी रेड (ता. शिराळा) येथील वनरक्षक रायना बापू पाटोळे या ८ महिन्यांच्या गर्भवती महिलेने कुपवाड येथील वनविभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांच्यासाेबत सचिन कचरे व इतर आठ वन कर्मचारीही आंदोलनात सहभागी झाले आहेत.
आंदोलनावेळी अधिकाऱ्यांच्या धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या. वरिष्ठ अधिकारी वन कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देतात. हा त्रास बंद झाला पाहिजे, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली. यावेळी पाटाेळे म्हणाल्या, रेड (ता. शिराळा) येथे वनरक्षक म्हणून चार वर्षांपासून मी काम करीत आहे. कार्यक्षेत्रात कोणाकडूनही माझ्याबाबत कोणतीही तक्रार नाही. माझ्या कार्यक्षेत्रातील शेखरवाडी वनक्षेत्रामध्ये शेखरवाडी ते इंगरूळ रस्त्यांचे काम होणार होते. त्याकामी बांधकाम विभाग व ठेकेदारास परवाना घेतल्याशिवाय कामे करू नका, असे सांगितले होते.
याबाबत वनक्षेत्रपाल सचिन जाधव व वनपाल सुरेश चरापले यांनाही माहिती दिली होती. पण, त्यांनी तडजोड करून आर्थिक व्यवहार करून माझ्या ताब्यात असलेल्या वनक्षेत्रामध्ये अवैध मार्गाने काम करण्यास परवानगी दिली. येथे अंदाजे ४५० ब्रास दगडाचे उत्खनन झाले आहे. त्यामुळे मी माझी जबाबदारी म्हणून त्यांच्यावर गुन्हा नोंद केला.
या गुन्ह्यामध्ये वनपाल व वनक्षेत्रपाल हे स्पष्टपणे सहभागी आहेत. याबाबत मी तक्रार अर्जदेखील केला होता. पण, आपण अडचणीत येऊ म्हणून त्यांनी माझ्यामुळे रस्त्याचे काम बंद पडले असे भासवून माझ्या बदनामीचे षडयंत्र रचले. मला कामामध्ये नाहक त्रास दिला. याबाबत वरिष्ठांकडे दाद मागूनही मला प्रतिसाद मिळाला नाही. सक्तीच्या रजेवरही पाठवले.
आंदोलनात राजश्री पाटील, विलास कदम, सुभाष पाटील, शिवाजी सावंत, गौरव गायकवाड, शिवाजी पवार, सचिन पाटील, किरण मोरी, तानाजी पाटील, सचिन कदम, नामदेव सिद, पांडुरंग उगळे या वन कामगारांसह सचिन कचरे (मरळनाथपूर) यांनी सहभाग घेतला.