खानापुरात रस्ता व नळ पाणीयाेजनेचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:26 AM2021-05-10T04:26:43+5:302021-05-10T04:26:43+5:30
खानापूरच्या जुन्या पेठेतील रस्ता, गटारी, नळ पाणीपुरवठा पाईपलाईन अशी कामे सुरू आहेत. या कामासाठी रस्ता तीन महिन्यांपूर्वी उकरला आहे ...
खानापूरच्या जुन्या पेठेतील रस्ता, गटारी, नळ पाणीपुरवठा पाईपलाईन अशी कामे सुरू आहेत. या कामासाठी रस्ता तीन महिन्यांपूर्वी उकरला आहे तेव्हापासून या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
दोन्ही बाजूंच्या गटारीचे काम पूर्ण होत आले आहे. सध्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनचे काम सुरू आहे. यासाठी रस्ता खुदाई केली जात आहे. पाईपलाईन तिहेरी असल्याने रस्ताही तीनवेळा खोदला जात आहे. परिणामी रस्त्यावर चर आणि मातीचे ढिगारे आहेत.
कामामुळे वाहतूक अगोदरच बंद आहे. सध्या काढलेल्या चरीमुळे व मातीच्या ढिगाऱ्यामुळे रस्त्याने पायी चालणेही मुश्किल झाले आहे. त्यातच वळीव पावसाने हजेरी लावल्याने कामात व्यत्यय येत आहे. कामास उशीर होत आहे. परिणामी नागरिकांच्या समस्या वाढत आहेत.
रस्ता खुदाई मुळे जुनी पाईपलाईन पूर्ण काढून टाकली आहे. त्यामुळे शहरातील बहुतांशी भागातील नळ पाणीपुरवठा गेले पाच दिवस बंद आहे. लोकांना पाण्याची गंभीर समस्या जाणवत आहे. मात्र, रस्त्यामुळे पाणी आणताही येत नाही.
या गैरसोयीमुळे नागरिक त्रासले आहेत. नागरिकांतून खानापूर नगरपंचायतीने रस्त्याचे व नळ पाणीपुरवठा पाईपलाईनचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.