अनुदानात वाढ करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:24 AM2021-04-14T04:24:11+5:302021-04-14T04:24:11+5:30
सांगली : निराधारांना शासनाकडून प्रतिमाह अत्यल्प अनुदान दिले जाते. हे अनुदान अत्यंत कमी आहे. महागाईत प्रचंड प्रमाणात वाढ झाली ...
सांगली : निराधारांना शासनाकडून प्रतिमाह अत्यल्प अनुदान दिले जाते. हे अनुदान अत्यंत कमी आहे. महागाईत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अनुदानात वाढ करण्यात यावी, अशी मागणी अनेकदा करण्यात येऊनही शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. महागाई वाढत असल्याने अनुदान तुटपुंजे ठरत आहे. या अनुदानामध्ये वाढ करावी, अशी मागणी लाभार्थींमधून हाेत आहे.
———
अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाईची मागणी
सांगली : शहरात अल्पवयीन वाहनचालकांकडून भरधाव वेगाने वाहने चालवली जात आहेत. मात्र, याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अपघातही घडलेले असून, या भरधाव वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे.
———
धूम्रपानामुळे आजार बळावले
मिरज : आहाराच्या बदलत्या सवयी, अंमली पदार्थांचे सेवन, मद्यपान, धूम्रपान यामुळे अनेक गंभीर परिणाम समोर येत आहेत. अनेक जणांना आजाराची लागण होत आहे. त्यातच गेल्या दाेन दिवसांपासून वातावरणातील बदलांमुळे खासगी रुग्णालयांमध्ये गर्दी वाढत आहे.
—————
शासकीय निवासस्थानी राहणे सक्तीचे करा
सांगली : शासनाने लाखो रुपये खर्च करून येथे कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधून घेतली. मात्र शासकीय कर्मचारी या निवासस्थानांना ‘खो’ देत असल्याने कर्मचाऱ्यांना देखभालीअभावी ही निवासस्थाने ओसाड झाली आहेत. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना शासकीय निवासस्थानी राहणे सक्तीचे करावे, अशी मागणी हाेत आहे.
———
खुल्या जागेत कचऱ्याचे साम्राज्य
जत : जत नगरपरिषद क्षेत्रात अनेक प्रभागांमध्ये खुल्या जागा आहेत. मात्र यातील बहुतांश जागांना संरक्षण भिंत नाही. परिणामी अशा जागा तळीरामांचे अड्डे ठरत आहेत. तसेच या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. नगरपरिषद प्रशासनाने शहरातील सर्वच खुल्या जागांचा विकास करावा. अशी मागणी नागरिकांमधून हाेत आहे.
—————-
रस्त्याच्या बाजूला वाहने लावणाऱ्यांवर कारवाई करा
सांगली : शहरातील कापडपेठ, गणपती पेठ, हरभट रस्ता परिसरात अगदी रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने उभी केली जातात. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये अशा वाहनांवर हाेणाऱ्या कारवायांचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी वाहने रस्त्यावर लावण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. अशा वाहनांवर कारवाई करण्याची मागणी आहे.
————
गादी व्यावसायिक आले अडचणीत
सांगली : गेल्या दीड वर्षांपासून लग्नसराई बंद आहे. याशिवाय लॉजिंगही बंद आहे. शाळा-महाविद्यालये बंद असल्याने वसतिगृहेही ओस पडली आहेत. गाद्यांची मागणी कमालीची घटली असून, गादी व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या गादी व्यावसायिकांना कुटुंबाचा गाडा हाकलणे कठीण झाले असून, आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे.
————
कर्जवसुली थांबविण्याची मागणी
तासगाव : सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्य जनतेला रोजगार उपलब्ध नाही. त्यामुळे खेड्यापाड्यातील महिला बचतगटांना बँकांनी दिलेली कर्जवसुली काही काळ थांबवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
—————
ओव्हरलोड वाहतुकीमुळे लहान रस्त्यांची वाताहात
सांगली : शहरातील विविध उपनगरांमध्ये सध्या अनेक बांधकामे सुरू आहेत. यासाठी खडी वीट वाळू घेऊन येणाऱ्या ओव्हरलोड डंपरमुळे रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय बनली आहे. तसेच या वाहतुकीमुळे परिसरात प्रदूषणही मोठ्या प्रमाणात वाढले असून, त्याचा नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.