शिराळा तालुक्यात रेमडेसिविर वाढवून देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:26 AM2021-05-09T04:26:22+5:302021-05-09T04:26:22+5:30
शिराळा : शिराळा हा डोंगरी व ग्रामीण तालुका आहे. त्यामुळे येथील कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा जादा कोटा ...
शिराळा : शिराळा हा डोंगरी व ग्रामीण तालुका आहे. त्यामुळे येथील कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा जादा कोटा द्यावा, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाइकांकडून होत आहे. उपजिल्हा रुग्णालयात सध्या हे इंजेक्शन नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ सुरू आहे.
शिराळा डाेंगरी तालुका असल्याने ५०-६० किलोमीटरवरून शिराळा उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण उपचारासाठी येतात. वैद्यकीय उपचार आणि लागणारी औषधे यांचा खर्च त्यांना न पेलणारा आहे. अनेकांनी आपले घर, शेतीही गहाण ठेवून किंवा विकून उपचार केले आहेत. उपजिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांना वेळेत रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नाही. त्यामुळे रुग्ण व नातेवाईक हवालदिल होत आहेत.
रुग्णालयातून मागणी होते. अन्न व औषध प्रशासन विभाग खासगी रुग्णालयात तर जिल्हा शल्यचिकित्सक शासकीय रुग्णालयात हे इंजेक्शन पाठविण्याचे नियोजन पाहतात. खासगी रुग्णालयात ही इंजेक्शन शिल्लक असतील तर ते शासकीय रुग्णालयातील अतिगंभीर रुग्णांसाठी द्यावीत, अशी मागणी होत आहे. ज्यावेळी या शासकीय रुग्णालयात हे इंजेक्शन उपलब्ध होईल, त्यावेळी ते परत त्या हॉस्पिटलला देणे बंधनकारक ठेवावे. यामुळे रुग्णांचे प्राण वाचतील, अशी मागणी हाेत आहे.
चौकट
शुक्रवारी (दि. ७) उपजिल्हा रुग्णालयात १६ रुग्णांना या इंजेक्शनची गरज होती. तसेच चार-पाच रुग्णांना तातडीने हे इंजेक्शन देणे आवश्यक होते. मात्र एकही इंजेक्शन नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ सुरू होती. याबाबत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांना फोन करणे, मोबाईलवर मेसेज करून काही व्यवस्था होते का, यासाठी धडपड सुरू होती. मात्र सगळीकडून फक्त आणि फक्त आश्वासन मिळत हाेते. ही धावपळ शनिवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच होती.