मिरजेत गांधी चाैक पोलीस ठाण्याच्या स्थलांतराची सुधार समितीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:31 AM2021-08-12T04:31:06+5:302021-08-12T04:31:06+5:30
मिरज : मिरजेतील गांधी चौक पोलीस ठाण्याची जागा नागरिकांसाठी अडचणीची आहे. त्यामुळे पोलीस ठाणे अन्यत्र स्थलांतरित करण्याची मागणी शहर ...
मिरज : मिरजेतील गांधी चौक पोलीस ठाण्याची जागा नागरिकांसाठी अडचणीची आहे. त्यामुळे पोलीस ठाणे अन्यत्र स्थलांतरित करण्याची मागणी शहर सुधार समितीतर्फे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांच्याकडे करण्यात आली. पोलीस ठाण्यासाठी पर्यायी जागेचा शोध सुरू असल्याचे लाेहिया यांनी यावेळी सांगितले.
मिरजेत ग्रामीण पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी सुधार समितीच्या शिष्टमंडळाने लोहिया यांची भेट घेऊन गांधी चाैक पोलीस ठाणे मध्यवर्ती ठिकाणी स्थलांतरित करावे तसेच रेल्वेस्थानक परिसरात पोलीस चौकी उभारावी, अशी मागणी केली.
मिरजेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत विभाजन करून गांधी चौक पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. या ठाण्याच्या कार्यक्षेत्राची रचना सदोष आहे. वैद्यकीय व इतर कारणांसाठी मिरजेत येणाऱ्या परप्रांंतीय व परजिल्ह्यातील नागरिकांना मिरज रेल्वेस्थानक व शहर बसस्थानक, या गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रमुख गर्दीच्या ठिकाणी लूटमारीचे प्रकार सुरू आहेत. रेल्वेस्थानकामागे ख्वॉजा वसाहतीत गुन्हेगारांचा वावर आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत लुटमार, प्रवाशांवर प्राणघातक हल्ला, अमली पदार्थाची तस्करी व व्यसनींकडून होणारे गुन्हे, यामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यातच गांधी चाैक पोलीस ठाणे कुपवाड रस्त्यावर लांब व अडचणीच्या ठिकाणी असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. गांधी चाैक पोलीस ठाणे वंटमुरे कॉर्नर व झारीबाग परिसरात मध्यवर्ती ठिकाणी सुरू करावे. तसेच मिरज रेल्वेस्थानकाजवळ महापालिकेच्या जुना जकात नाक्याच्या खोलीत पोलीस चौकी सुरू करण्याची मागणीही समितीचे अॅड. ए. ए. काझी, अध्यक्ष शंकर परदेशी, बाळासाहेब पाटील, संतोष माने, मुस्तफा बुजरूक, शाहीद सतारमेकर, राकेश तामगावे यांच्या शिष्टमंडळाने निवेदनात केली आहे.
यावेळी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा डूबल, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक वीरकर उपस्थित होते.