मुंबईतील काॅर्पोरेट हाॅस्पिटलकडून नर्सिंग विद्यार्थ्यांना मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:42 AM2020-12-15T04:42:26+5:302020-12-15T04:42:26+5:30
मिरजेतील वॉन्लेस हॉस्पिटलच्या कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयात मुंबई येथील कोकिळाबेन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्यावतीने कॅम्पस मुलाखती पार पडल्या. अभियांत्रिकी महाविद्यालयात कॅम्पस ...
मिरजेतील वॉन्लेस हॉस्पिटलच्या कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयात मुंबई येथील कोकिळाबेन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्यावतीने कॅम्पस मुलाखती पार पडल्या. अभियांत्रिकी महाविद्यालयात कॅम्पस मुलाखतीद्धारे विद्यार्थांची नोकरीसाठी निवडीची पद्धत आहे. मात्र परिचारिका भरतीसाठी कॉर्पोरेट रुग्णालयाकडून मुलाखतीची ही पहिलीच घटना आहे. कोकिळाबेन रुग्णालयाच्या अधिकारी होवावी फौजदार व पौर्णिमा पाटील यांनी घेतलेल्या मुलाखतीत सहभागी सुमारे ५० परिचारक पदवीधरांची रुग्णसेवेसाठी निवड झाली.
यावेळी वॉन्लेस रुग्णालयाचे संचालक डॉ. नथानियल ससे, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या संगीता सातवेकर उपस्थित होत्या.
मिरजेतील वाॅन्लेस परिचर्या महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी मोठ्या शहरात काॅर्पोरेट रुग्णालयात काम करीत आहेत. कोकिळाबेन रुग्णालयातही ‘वाॅन्लेस’मध्ये प्रशिक्षित परिचारक काम करीत असल्याने तेथील प्रशासनाने वाॅन्लेसमधील प्रशिक्षित विद्यार्थांची दरवर्षी कॅम्पस मुलाखतीतून निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील फोर्टिस, पुण्यातील दीनानाथ मंगेशकर या काॅर्पोरेट हाॅस्पिटलनीसुद्धा मिरजेतील वाॅन्लेसच्या परिचारक विद्यार्थांसाठी कॅम्पस मुलाखती घेण्याची तयारी दर्शविल्याचे नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या संगीता सातवेकर यांनी सांगितले.
फोटो-१४मिरज१