चार जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांचा मंगळूर गाडीसाठी जोहार; कर्नाटक, केरळमधील व्यापाऱ्यांचे खासदारांना पत्र
By अविनाश कोळी | Published: July 10, 2024 07:17 PM2024-07-10T19:17:48+5:302024-07-10T19:19:36+5:30
पंधरा वर्षापूर्वी मिरज-मंगळूर जुनी महालक्ष्मी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली
सांगली : व्यापारी, नोकरदार, उद्योजक व पर्यटनासाठी जाऊ पाहणाऱ्या सातारा, कोल्हापूर, सांगली, बेळगाव जिल्ह्यातील प्रवाशांसाठी मंगळूरला जाण्यासाठी सध्या कोणतीही दैनंदिन गाडी उपलब्ध नाही. त्यामुळे कर्नाटक व केरळ येथील व्यापारी संघटनांनी रेल्वे तसेच जिल्ह्यातील खासदारांकडे हा प्रश्न मांडला आहे.
व्यापारी संघटनांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंधरा वर्षापूर्वी मिरज-मंगळूर जुनी महालक्ष्मी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. आता आठवड्यातून मंगळूरला जाण्यासाठी पुर्णा एक्सप्रेस ही एकमेव साप्ताहिक गाडी आहे. त्यामुळे सातारा, कराड, कोल्हापूर, सांगली, बेळगाव, येथील लोकांना मंगळुरूला जाण्यासाठी खूप कसरत करावी लागत आहे. चार जिल्ह्यातून केरळला कामानिमित्त जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. याशिवाय मंगळूर येथे पर्यटनासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांनाही रेल्वेचा दैनंदिन पर्याय उपलब्ध नाही. कोणत्याही व्यक्तीला तातडीच्या वेळी मंगळूरला किंवा त्या भागातून या चारही जिल्ह्यात येण्यासाठी पर्याय उपलब्ध नाही.
त्यामुळे प्रतिष्ठित जुनी महालक्ष्मी एक्स्प्रेस (मिरज ते मंगळूर), अर्सिकेरेमार्गे दररोज सुरु करावी. सातारा, मिरज, बेळगाव, लोंढा, मडगाव, मंगळूरमार्गे जाणारी एकमेव साप्ताहिक रेल्वे (क्र. ११०९७ व ९८) पूर्णा एक्स्प्रेस आठवड्यातून तीनवेळा सुरु करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. व्यापारी संघटनांनी सांगलीच्या नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांच्याशीही चर्चा केली. संघटनांनी एकत्र येत यासाठी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
निवेदनावर कर्नाटक, केरळ व्यापारी असोसिएशनचे फिरोस ए. पी., अर्शद के. पी., रेनी जॉर्ज, गेनू जॉय, सुरेश टी. जी., बेंझी बाबू जॉर्ज, मुजीब पी. सी., विजयन टी, फरशीद ए. पी., सजीवन यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
वंदे भारत एक्सप्रेसची मागणी
कर्नाटक, केरळ व्यापारी संघटनेने रेल्वेकडे वंदे भारत एक्सप्रेसची मागणी केली आहे. आर्सिकेरे मार्गे कोल्हापूर ते मंगळूर या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला आहे.
मंगळूरला जाण्यासाठी येत असलेल्या प्रवाशांच्या अडचणींचा विचार करुन आम्ही त्याबाबत पाठपुरावा करणार आहोत. यापूर्वीही रेल्वेकडे या गाडीबाबत पत्रव्यवहार केला होता. मात्र, रेल्वेकडून प्रवाशांची मागणी दुर्लक्षित करण्यात आली. - सतीश साखळकर, अध्यक्ष, नागरिक जागृती मंच