मांगलेची शाळा खासगीच्या घशात घालण्याचा डाव
By admin | Published: June 24, 2015 12:21 AM2015-06-24T00:21:00+5:302015-06-24T00:41:23+5:30
लोकप्रतिनिधींचा आरोप : आंदोलनाचा इशारा
मांगले : मांगले (ता. शिराळा) येथील ४५० पटसंख्या असलेली जिल्हा परिषदेची शाळा बंद पाडून, एका खासगी शाळेला मदत करण्यासाठी शाळेच्या सर्व वर्गखोल्या भाड्याने देण्याचा घाट शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी घातला आहे. त्यांची चौकशी करुन कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा पंचायत समितीचे माजी सभापती प्रल्हाद पाटील, सरपंच दत्तात्रय पाटील व उपसरपंच संदीप तडाखे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.
मांगले येथील फत्तेसिंगराव नाईक मंडळ संचलित आदर्श बालक मंदिर शाळेच्या व्यवस्थापनाने केंद्रशाळा असणाऱ्या जिल्हा परिषद मराठी शाळेच्या वर्गखोल्यांची मागणी शिराळ्याचे गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे केली होती. त्या पत्राच्याआधारे या अधिकाऱ्याने चौकशी न करताच, वर्गखोल्या खासगी शाळेला देण्यात याव्यात, असा पत्रव्यवहार केला आहे. शाळेला पत्र प्राप्त होताच व्यवस्थापनाला माहिती दिली. या प्रकाराबद्दल समितीने संताप व्यक्त केला.
जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या साडेचारशे असताना आणि शाळांतील मुलांना वर्गखोल्या कमी पडत असताना, गटशिक्षण अधिकाऱ्यांनी लावलेला हा जावईशोध म्हणजे संशोधनाचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे खासगी शाळेने ११ जूनरोजी मागणी केली व त्याअगोदरच ३ आॅगस्टची तारीख टाकून मुख्याध्यापकांकडे खोल्यांचा खुलासा मागवून भीमपराक्रम केला आहे, असा खुलासा प्रल्हाद पाटील, सरपंच दत्तात्रय पाटील यांनी केला. (वार्ताहर)
चौकशीची मागणी
स्वत:च्या शासनाच्या शाळा बंद पाडण्याचा प्रयत्न करून खासगी शाळा चालविण्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांचा स्वार्थ काय? याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी. त्याचबरोबर या शाळाखोल्या खासगी शाळेला देऊन शासनाच्या शाळा बंद पाडण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.