कुपवाडमध्ये उद्याेजकाकडे खंडणीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:25 AM2021-01-21T04:25:31+5:302021-01-21T04:25:31+5:30
कुपवाड : शहरातील शिवशक्तीनगरमधील भगवानराम परमार या उद्योजकाला तेथीलच दोघा संशयितांनी खंडणीसाठी धमकी देऊन कारखान्यातील साहित्याची मोडतोड केली. ...
कुपवाड : शहरातील शिवशक्तीनगरमधील भगवानराम परमार या उद्योजकाला तेथीलच दोघा संशयितांनी खंडणीसाठी धमकी देऊन कारखान्यातील साहित्याची मोडतोड केली. याप्रकरणी पोलिसांनी आसिफ शेख ऊर्फ सोन्या व त्याच्या अनाेळखी साथीदार अशा दोघांविरुध्द कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
शिवशक्तीनगरमध्ये भगवानराम परमार यांचा स्टील फर्निचरचा कारखाना आहे. बुधवारी सायंकाळी संशयित आसिफ शेख ऊर्फ सोन्या व त्याच्या साथीदाराने परमार यांच्या कारखान्यात घुसून परमार व त्यांच्या पत्नीला धमकी दिली. कारखाना चालवायचा असेल तर मला दरमहा खंडणी दिली पाहिजे. खंडणी दिली नाहीतर कारखाना चालवू देणार नाही. तुम्हाला जीवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली.
परमार यांनी मी खंडणी देणार नाही असे म्हणताच त्यांनी कारखान्यातील साहित्याची तोडफोड केली. सीसीटीव्ही कॅमेरे फोडून आर्थिक नुकसान केले.
याबाबत परमार यांनी कुपवाड पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयितांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रार दाखल होताच पोलिसांनी दोन्ही संशयितांना रात्री उशिरा ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.