खासगी सावकारीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी दोन लाखाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:21 AM2021-06-01T04:21:03+5:302021-06-01T04:21:03+5:30
कुपवाड : लताबाई गणपतराव पाटील (रा. रामकृष्णनगर, कुपवाड, ता. मिरज) व त्यांचा मुलगा, मुलगी यांना प्रत्यक्ष भेटून, फोनवरून संपर्क ...
कुपवाड : लताबाई गणपतराव पाटील (रा. रामकृष्णनगर, कुपवाड, ता. मिरज) व त्यांचा मुलगा, मुलगी यांना प्रत्यक्ष भेटून, फोनवरून संपर्क साधून खासगी सावकारीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी दोन लाख रुपये मागितल्याप्रकरणी चार महिलांच्या विरोधात कुपवाड पोलिसात सोमवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये संशयित सविता महादेव गावडे, शोभा बाळू कसबे, रेखा हेमंत जाधव, लता बाबासाहेब पाटील (सर्व रा. रामकृष्णनगर, कुपवाड) या महिलांचा समावेश आहेे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी लताबाई पाटील यांची मुलगी नेहा शिंदे यांनी संशयित सविता गावडे व शोभा कसबे यांना एक लाख ५० हजार रुपये बिनव्याजी दिले होते. शिंदे यांना संशयित गावडे व कसबे यांनी १५ हजार रुपये देऊन बाकीचे पैसे बुडवून दि. २८ एप्रिल ते दि. १९ मे या कालावधीत लताबाई पाटील यांचा मुलगा व मुलगी यांच्या घरी संशयित चार महिलांनी खासगी सावकारीची केस दाखल न करण्याची व मध्यस्थीने मिटवण्यासाठी प्रत्यक्ष भेटून व फोनवरून दोन लाख रुपयांची मागणी करून धमकी दिली. याबाबतची तक्रार कुपवाड पोलिसात सोमवारी रात्री उशिरा दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी संशयित चार महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस तपास करीत आहेत.