म्हैसाळमध्ये ऑक्सिजन बेडसह कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:26 AM2021-05-06T04:26:55+5:302021-05-06T04:26:55+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क म्हैसाळ : सलगरे (ता. मिरज) येथील सरपंच तानाजी पाटील यांनी ग्रामीण भागात ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
म्हैसाळ : सलगरे (ता. मिरज) येथील सरपंच तानाजी पाटील यांनी ग्रामीण भागात ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर सुरू केले आहे. असे कोविड सेंटर म्हैसाळ येथे का सुरू हाेऊ शकत नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. गावात काेविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने तात्काळ येथे ऑक्सिजन सुविधेसह काेविड सेंटर सुरू करण्याची मागणी हाेत आहे.
मिरज तालुक्याच्या मोठ्या गावाच्या यादीत म्हैसाळचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. गावची लोकसंख्या मोठी आहे. सध्या गावात १३० हून अधिक काेराेनाबाधित रुग्ण आहेत. त्यातील १२१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत, तर ९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर खासगी व सरकारी काेविड रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागात अनेक नागरिकांच्या घरामध्ये होम क्वारंटाइनमध्ये उपचार घेण्याची सोय नाही. त्यामुळे संक्रमण वाढत आहे. त्यामुळे म्हैसाळ आपत्ती व्यवस्थापन समितीने तात्काळ ऑक्सिजन बेड व साधे बेड असलेले कोविड सेंटर सुरू करणे गरजेचे आहे. गावातील शाळेमध्ये ते सुरू करता येईल. महिला व पुरुष असे दोन विभाग करून प्रत्येकाला स्वतंत्र शाळेत ठेवून त्यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार होऊ शकतात. अशा पद्धतीचे कोविड सेंटर सुरू झाले, तर गावातील काही लोक कोरोनाबाधित रुग्णांना मोफत योगा शिकविण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीव वाचायचे असतील, तर ऑक्सिजन बेड व साधे बेड अशा दोन्ही बेडची व्यवस्था करणे गरजेचे आहे.
काेट
म्हैसाळमध्ये सामान्य लोक घरातील जागा अपुरी असल्याने होम आयसोलेशनमध्ये राहून उपचार घेऊ शकत नाहीत. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन समितीने तात्काळ ऑक्सिजन बेड व साधे बेड असलेले कोविड सेंटर म्हैसाळमध्ये उभे करावे. कोरोनाबाधित रुग्णांसाठी योग व ध्यान शिबिरे आम्ही घेऊ.
- अजित कबुरे, व्यापारी, म्हैसाळ.