शिराळा निगडीमार्गे इस्लामपूर बससेवा सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:27 AM2021-03-27T04:27:43+5:302021-03-27T04:27:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : शिराळा तालुक्यातील उत्तर भागातील विद्यार्थ्यांना इस्लामपूर येथे शिक्षणासाठी जाण्यासाठी एसटीची सेवा सुरू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा तालुक्यातील उत्तर भागातील विद्यार्थ्यांना इस्लामपूर येथे शिक्षणासाठी जाण्यासाठी एसटीची सेवा सुरू करावी. या मार्गावर पूर्वीप्रमाणे नियमित एसटी सुरू व्हावी, यासाठी आगारप्रमुख विद्या कदम यांना सरपंच संध्या कदम, सदस्य सचिन कदम, गणेश माने यांनी निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, तालुका भौगोलिकदृष्ट्या दुर्गम आहे. शिक्षणाच्या सोयी-सुविधा जवळ उपलब्ध नाहीत. शिराळ्यानंतर विद्यार्थ्यांना इस्लामपूर येथे पुढील शिक्षणासाठी जावे लागते. यासाठी या मार्गावर नेहमीच बस सेवा गरजेची आहे. तालुक्यातील पाडळी, पाडळीवाडी, निगडी, शिरशी, करमाळे या गावातील विद्यार्थ्यांना इस्लामपूरला जाण्यासाठी शिराळा ते निगडीमार्गे बस आहेेत. सध्या या मार्गावरील बस बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना दररोज चार किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागत आहे.
सकाळी सात वाजता शिरशी-इस्लामपूर गाडीने ही मुले महाविद्यालयात जातात. मात्र परत येण्यासाठी त्यांना बसची सुविधाच नाही. पर्यायी व्यवस्था म्हणून इस्लामपूर आगारातील एसटीने सुरूलपर्यंत ही मुले प्रवास करतात. तेथून पुढे मात्र मिळेल त्या वाहनाने किंवा पर्यायी चालत प्रवास करावा लागतो. महाविद्यालयाची वेळ आठ ते बारा अशी असून १२ नंतर चार वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना इस्लामपूर बस स्थानकात थांबावे लागते. किंवा पर्यायी वाहतूक साधनांचा वापर करावा लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. या सगळ्याचा विचार करून लवकरात लवकर ही सेवा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.