मायक्रो फायनान्सची जुलमी वसुली थांबविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:20 AM2021-06-01T04:20:10+5:302021-06-01T04:20:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होणारी वसुली थांबवावी आणि निराधार महिलांना अर्थसहाय्य करावे, अशी मागणी पुरोगामी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होणारी वसुली थांबवावी आणि निराधार महिलांना अर्थसहाय्य करावे, अशी मागणी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महिला आघाडीने केली. जिल्हाध्यक्षा संगीता साठे व रतन लोखंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना निवेदन दिले.
पुरोगामी संघर्ष परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांच्यासह नयना लोंढे, स्वाती सौंदडे, छाया मोरे, ज्योती गोकाक, सावळा खुडे, अमर शिंदे, अक्षय खुडे, खंडू कांबळे, विजय सौंदडे, वासू गोकाक, सर्जेराव भंडारे, बबन मोरे आदी उपस्थित होते.
त्यांनी मागण्या केल्या की, मायक्रो फायनान्सकडील सर्व कर्जे माफ करावीत, विधवा, परित्यक्ता व निराधार महिलांना पुढील दोन वर्षांसाठी दरमहा तीन हजार रुपये मदत द्यावी, कोरोना काळात उघड्यावर आलेले संसार नव्याने उभे करण्यासाठी राष्ट्रीय बँकांकडून बिनव्याजी व बिगर जामीनदार एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळावे.
पंधरा दिवसांत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.