शेटफळे ग्रामविकास अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:27 AM2021-03-16T04:27:07+5:302021-03-16T04:27:07+5:30
करगणी : शेटफळे (ता. आटपाडी) येथील ग्रामविकास अधिकारी एल. ए. सनदी यांचे निलंबन करण्याची मागणी शेटफळेतील घरे पाडलेल्या बाधितांनी ...
करगणी
: शेटफळे (ता. आटपाडी) येथील ग्रामविकास अधिकारी एल. ए. सनदी यांचे निलंबन करण्याची मागणी शेटफळेतील घरे पाडलेल्या बाधितांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान शेटफळे गावातून दिघंची ते हेरवाड राज्य महामार्ग जात असून शेटफळे गावामध्ये बांधकाम विभाग मिरज अंतर्गत येत असणाऱ्या महामार्गावरील अडथळे शेटफळे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी एल. ए. सनदी यांनी नोटीस देत हटवली होती. यामध्ये सुमारे तीस ते चाळीस मालमत्ताधारकावर कारवाई करत पंधरा घरे पाडण्यात आली होती. यावेळी घरमालकांनी विरोध करूनही बळजबरीने घरे पाडण्यात आली होती.
दरम्यान याबाबत मालमताधारकांनी उच्च न्यायालयात दाद मागत नुकसान भरपाईची मागणी केली होती.
तसेच विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जिल्हाधिकारी याच्यासोबत बैठक घेत मोजणी करूनच महामार्ग बनवण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले होते. मोजणीअंती कोणत्याही मालमत्ताधारकांनी अतिक्रमण केले नसल्याचे निष्पन्न झाले होते. या पार्श्वभूमीवर अतिक्रमण केले नसतानाही महामार्गाच्या कामासाठी ग्रामविकास अधिकाऱ्यांनी बेकायदेशीररित्या घरे पाडली आहेत अशा लोकांनी ग्रामविकास अधिकारी यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. शशिकांत गायकवाड, धर्मदास कुंभार, धनाजी गायकवाड, मलिकार्जुन बिराजदार, भारत माने, प्रदीप क्षीरसागर, हरिराम नरळे आदींनी निवेदन दिले आहे.