कोल्हापूर ते हैदराबादसह अन्य रेल्वे सुरू करण्याची मागणी, रेल्वे प्रवासी सल्लागार समितीची मुंबईत बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 04:10 PM2023-10-06T16:10:52+5:302023-10-06T16:11:08+5:30
मिरज : मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या मुंबईतील बैठकीत साप्ताहिक कोल्हापूर हैदराबाद व वडोदरा एक्स्प्रेस, कोल्हापूर मुंबई ...
मिरज : मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या मुंबईतील बैठकीत साप्ताहिक कोल्हापूर हैदराबाद व वडोदरा एक्स्प्रेस, कोल्हापूर मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस लवकर सुरू करण्याची मागणी करण्यात आली. नवीन रेल्वे गाड्या सुरू करण्याचे आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले.
नागपूर, कोल्हापूर व धनबाद कोल्हापूर या दोन गाड्या कोल्हापूर येथे आल्यानंतर सुमारे ३५ तास देखभाल दुरुस्ती झाल्यानंतर रुकडी व हातकणंगले येथे आणून थांबवण्यात येतात. यावेळेचा उपयोग करून साप्ताहिक कोल्हापूर हैदराबाद व वडोदरा गाड्या सुरू करण्याची मागणी सदस्य सुकुमार पाटील यांनी केली.
मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक नरेश लालवानी, अभय कुमार मिश्रा यांनी या गाड्या सुरू करण्यास तत्त्वतः मान्यता दिली. हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्याचे आश्वासन दिले. बिकानेर ते पुणे येणारी गाडी पुढे पुणे ते मिरज अशी वेगळी क्रमांकाने धावते. त्यामुळे मिरज सांगली कोल्हापूर हातकणंगले येथून जाणाऱ्या प्रवाशांना दोन वेगवेगळी तिकिटे घ्यावे लागत असल्याने नाहक भुर्दंड होतो. ही एकच गाडी असताना दोन वेगवेगग्या क्रमांकाने धावण्याऐवजी बिकानेर ते मिरज अशी एकाच क्रमांकाची गाडी चालवण्याची सूचना केली.
पुणे दिल्ली दर्शन एक्स्प्रेस मिरजपर्यंत वाढवली आहे, त्या धर्तीवर बिकानेर ते मिरज एक्स्प्रेस करावी ही मागणी बैठकीत मान्य केली. कोल्हापूर ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस लवकर सुरू करण्याची मागणी केली. याबाबत वरिष्ठ स्तरावर तयारी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही गाडी लवकरच सुरू होईल, असे आश्वासन दिले. बैठकीस खासदार धनंजय महाडिक, सोलापूरचे खासदार सिद्धारूढ स्वामी यांच्यासह कर्नाटक, महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील सल्लागार उपस्थित होते.