शिक्षक बदल्यांतील गोंधळाचा जिल्हा परिषदेत निषेध: राज्यस्तरावरून बदल्यांची प्रक्रिया राबविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 07:42 PM2018-06-08T19:42:25+5:302018-06-08T19:42:25+5:30
राज्यस्तरावरून शिक्षकांच्या बदल्या केल्यामुळे जिल्'ातील ८६ शाळांमध्ये एकही शिक्षक नसल्यामुळे तेथील विद्यार्थी खासगी शाळांमध्ये जात आहेत. पालकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.
सांगली : राज्यस्तरावरून शिक्षकांच्या बदल्या केल्यामुळे जिल्'ातील ८६ शाळांमध्ये एकही शिक्षक नसल्यामुळे तेथील विद्यार्थी खासगी शाळांमध्ये जात आहेत. पालकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. जत, आटपाडी, खानापूर येथील शिक्षकांची रिक्त पदे कशी भरणार, याचे समाधानकारक उत्तर एकही अधिकारी देऊ शकत नाही, या गोंधळाचा जिल्हा परिषदेच्या सभेत सदस्यांनी निषेध केला. ग्रामविकास विभागाच्या सचिवांच्या निषेधाचा ठरावही सदस्यांनी मांडला. पण अध्यक्षांनी तो फेटाळून लावला.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सर्वसाधारण सभा झाली. यावेळी उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती प्रा. डॉ. सुषमा नायकवडी, अरुण राजमाने, ब्रम्हदेव पडळकर, तम्मनगौडा रवी-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले आदी उपस्थित होते.
सत्यजित देशमुख, संभाजी कचरे, जितेंद्र पाटील, स्नेहलता जाधव, विक्रम सावंत, सरदार पाटील, प्रमोद शेंडगे, महादेव दुधाळ, जगन्नाथ माळी, अरुण बालटे आदी सदस्यांनी शिक्षकांच्या बदल्यांतील गोंधळाबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. दुर्गंम भागामधील शाळांमध्ये एकही शिक्षक कार्यरत नाही. सर्व तालुक्यात शिक्षकांची समान पदे रिक्त ठेवण्याची शासनाने भूमिका घेतली होती. पण, बदल्यांच्या दोन फेऱ्यांमध्ये जत, आटपाडी, खानापूर तालुक्यातील रिक्त जागा भरण्याऐवजी तेथील शिक्षकांच्या बदल्याच होत आहेत. परिणामी दुष्काळी भागामध्ये रिक्त जागांची संख्या कमी होण्याऐवजी वाढत आहे.
जिल्'ातील ८६ शाळांमध्ये एकही शिक्षक नाही. यापैकी जत तालुक्यातच सर्वाधिक ३४ शाळांची संख्या आहे. या शाळा कशा चालविणार आहेत? असा सवाल सदस्यांनी केला. बदल्यांचा गोंधळ शासनाने केला असून त्याची शिक्षा सदस्यांना भोगावी लागत आहे. पालक शिक्षक नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत. यांना काहीच उत्तर देता येत नाही. यामुळे शासनाच्या राज्यस्तरावरील बदलीतील सावळ्या गोंधळाचा सदस्यांनी निषेध केला.
ग्रामविकास विभागाच्या सचिवांच्या निषेधाचा काही सदस्यांनी ठराव मांडला होता. पण, तो अध्यक्ष देशमुख यांनी फेटाळून लावून विषय पटलावरून रद्द केला. शिक्षक बदल्यांतील गोंधळाबद्दल सदस्यांची मते शासनाकडे पाठविण्यात येतील, असेही देशमुख यांनी सांगितले.
शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्या जिल्हास्तरावरुनच करा
शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्या करण्यास काहीही हरकत नाही. पण, शिक्षकांची संख्या जास्त असल्यामुळे राज्यस्तरावरुन बदली प्रक्रिया राबविल्यामुळे गोंधळ जास्त निर्माण झाला आहे. शिक्षकांचे शाळेपेक्षा बदलीकडेच जास्त लक्ष आहे. या या सर्व गोंधळाचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे शासनाने आॅनलाईन बदल्या करण्यास काहीच हरकत नाही. परंतु, ही बदली प्रक्रिया जिल्हास्तरावरुन करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सत्यजित देशमुख, सरदार पाटील यांनी केली.
जिल्तील ७० शिक्षकांचे वैद्यकीय प्रमाणपत्र बोगस?
जिल्'तील काही शिक्षकांनी सोयीची बदली करुन घेण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र शासनाकडे सादर केले आहे. या वैद्यकीय प्रमाणपत्रांची छाननी झाली असून प्राथमिक चौकशीत ७० शिक्षकांचे वैद्यकीय प्रमाणपत्र बोगस असल्याचे दिसून येत आहे. यामुळे या शिक्षकांवर कठोर कारवाई शासन करणार आहे. ज्या वैद्यकीय अधिकारी अथवा खासगी डॉक्टरांनी प्रमाणपत्र दिले आहे, त्यांच्यावरही त्यांची वैद्यकीय सनद रद्द करण्यापर्यंतची कारवाई करणार आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी जाहीर केले.
गुरुजींचा उत्साह त्यांच्याच अंगलटी
सर्वसाधारण सभेचे कामकाज पाहण्यासाठी सभागृहाच्या प्रेक्षक गॅलरीत काही शिक्षकही बसले होते. शिक्षक बदल्यांचा प्रश्न सदस्य आक्रमकपणे मांडू लागल्यावर काही उत्साही शिक्षकांनी टाळ्या वाजविण्यास सुरुवात केली. यावरुन अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख भडकले. गॅलरीत कोण शिक्षक आहे ते पाहा आणि त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा, अशी सूचना अधिकारी, कर्मचाºयांना देताच गुरुजी गॅलरीतून लगेच पसार झाले. सभेचे कामकाज पाहताना सभागृहाच्या नियमांचा भंग करु नये, असा इशारा प्रेक्षक गॅलरीतील उपस्थितांना अध्यक्षांनी दिला.