मागणी तेथे तातडीने चारा छावण्या देणार
By admin | Published: May 4, 2016 11:11 PM2016-05-04T23:11:47+5:302016-05-05T00:26:05+5:30
दिलीप कांबळे : तासगावात आढावा बैठक
तासगाव : तासगाव तालुक्यात मागणी होईल तिथे तातडीने चारा छावण्या सुरु करण्यात येतील, असे मदत व पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी बुधवारी स्पष्ट केले. शेतकरी एकटा नाही, शासन तुमच्यासोबत आहे, हा मुख्यमंत्र्यांचा संदेश देण्यासाठी मी इथे आलो असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.कांबळे यांनी तालुक्यात गेल्या चार वर्षापासून टंचाईचा सामना करणाऱ्या धामणी, पाडळी आणि नरसेवाडी या गावांची पाहणी केली. या गावांतील परस्थिती जाणून घेतल्यानंतर तासगाव पंचायत समितीत आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार सुमनताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी सुभाष बोरकर, तहसीलदार सुधाकर भोसले, सभापती स्वाती लांडगे, उपसभापती अशोक घाईल, गटविकास अधिकारी सतीश गाढवे यांच्यासह अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. तालुक्यातील टंचाईबाबत पदाधिकाऱ्यांच्या भावना मंत्री कांबळे यांनी जाणून घेतल्या. त्यानंतर टंचाईबाबत सरकार संवेदनशील असून, तातडीने उपययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, १५ मे नंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणखी गंभीर होणार आहे. त्यामुळे शक्य असेल तिथे सिंंचन योजना सुरु ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाईल. चारा छावण्यांचा मागचा अनुभव चांगला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात मागणी केल्यानंतर तातडीने चारा छावणी सुरु करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. तरीदेखील एखादी चांगली संस्था चारा छावणीसाठी पुढाकार घेत असेल तर, अशा संस्थेला छावणी सुरु करण्यास परवानगी दिली जाईल.
मिरजेतून लातूरला पाणी देता, कर्नाटकला पाणी दिले जाते, मात्र पाणी योजना असूनदेखील पाच किलोमीटरवर असणाऱ्या धामणी, पाडळीसारख्या गावांना पाणी मिळत नाही, हे योग्य नाही. असे सांगून या गावांना दोन दिवसांत बुर्ली योजनेतून पाणी देण्याचे आदेश मंत्री कांबळे यांनी योवळी दिले. (वार्ताहर)...
‘प्रादेशिक’ वीज बिल : निर्णय आठ दिवसांत
प्रादेशिक पाणी योजनांना व्यावसायिक पध्दतीने वीज बिल आकारणी केली जाते. त्यामुळे योजनेचे १६ कोटींचे वीज बिल थकित आहे. हे वीज बिल शासनाने भरुन, यापुढे सिंंचन योजनांप्रमाणे कमी दराने वीज बिल आकारणी करावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी यावेळी केली होती. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत आठ दिवसांत निर्णय घेऊन वीज बिल कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिलीप कांबळे यांनी दिले.