सांगलीत हमालांचा माथाडी मंडळावर मोर्चा-कामावरून काढलेल्या हमालांना परत घेण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 11:45 PM2019-01-22T23:45:01+5:302019-01-22T23:47:20+5:30
सांगली : कुपवाड एमआयडीसीमधील एका कंपनीतून बेकायदेशीरपणे कमी करण्यात आलेल्या हमाल व महिला माथाडी कामगारांना तात्काळ कामावर घ्यावे, तसेच ...
सांगली : कुपवाड एमआयडीसीमधील एका कंपनीतून बेकायदेशीरपणे कमी करण्यात आलेल्या हमाल व महिला माथाडी कामगारांना तात्काळ कामावर घ्यावे, तसेच हमाल, तोलाईदार, महिला कामगारांच्या न्याय्य मागण्या पूर्ण कराव्यात, या मागणीसाठी हमाल पंचायत व सांगली जिल्हा तोलाईदार सभेतर्फे मंगळवारी माथाडी मंडळाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
हमाल आणि महिला कामगारांच्या विविध मागण्यांसाठी विकास मगदूम आणि बाजार समितीचे संचालक बाळासाहेब बंडगर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. मागण्यांबाबत यापूर्वीच पत्र दिले आहे, मात्र अद्याप त्यावर काहीही कारवाई झालेली नाही. कुपवाड एमआयडीसीमधील अर्जुन स्पायसेस प्रॉडक्ट कंपनीने हमाल व महिला माथाडी कामगारांवर केलेल्या अन्यायाबाबतही निवेदन दिले आहे. प्रत्यक्ष बैठक घेतली; तरीही अद्याप ते २१ कर्मचारी कामापासून वंचित आहेत. संबंधित कंपनी माथाडी मंडळाला न जुमानता इतर कामगारांकडून काम करून घेत आहे. माथाडी कामगारांना न्याय देण्याची जबाबदारी माथाडी बोर्डाची आहे. मात्र त्याच कामाचा विसर पडल्याचे दिसून येते. माथाडी बोर्डाचा हा प्रकार यापुढे खपवून घेतला जाणार नाही. अन्यथा रस्त्यावर उतरुन हातात दांडके घेऊन न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न करू.
कुपवाड एमआयडीसीतील ‘त्या २१ कामगारांना’ तात्काळ कामावर घ्या, अन्यथा आंदोलन करण्यात येईल. याशिवाय २६ नोव्हेंबरच्या हमाल, तोलाईदार व माथाडी महिला मंडळाच्या न्याय्य मागण्या ३० जानेवारीपूर्वी मान्य करा, अन्यथा ३१ पासून मंडळाच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करू, असा इशाराही कामगारांनी दिला आहे. यावेळी बजरंग खुटाळे, गोविंद सावंत, प्रल्हाद माने, राजाराम बंडगर, संजय मोरे, श्रीमंत बंडगर, यशवंत सावंत, शोभा कलगुटगी, शालन मोकाशी, सुवर्णा पांढरे, रेणुका वडर यांच्यासह काम बंद ठेवून मार्केट यार्डातील सर्व हमाल आंदोलनात सहभागी झाले.