सांगली: रजा मंजुरीसाठी ६० हजारांच्या लाचेची मागणी, गटशिक्षणाधिकाऱ्यासह शिक्षक जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 01:22 PM2022-10-15T13:22:21+5:302022-10-15T13:22:50+5:30
६० हजारांच्या लाचेची मागणी करीत त्यातील १५ हजार रुपये स्वीकारताना करण्यात आली कारवाई
सांगली : अर्जित रजा मंजूर करून देण्यासाठी ६० हजारांच्या लाचेची मागणी करीत त्यातील १५ हजार रुपये स्वीकारताना जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकासह गटशिक्षणाधिकाऱ्याला पकडण्यात आले. मुचंडी (ता. जत) येथील शाळेत ही कारवाई करण्यात आली. गटशिक्षणाधिकारी रतिलाल मऱ्याप्पा साळुंखे (वय ५२, रा. डोणज, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) व शिक्षक कांताप्पा दुंडाप्पा सन्नोळी (४२, रा. बेलदार गल्ली, जत) अशी संशयितांची नावे आहेत.
सहायक गटविकास अधिकारी असलेल्या साळुंखे याच्याकडे गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. तक्रारदार शिक्षकाने अर्जित रजा मंजुरीसाठी गटशिक्षणाधिकाऱ्याकडे अर्ज केला होता. त्यानंतर रजा मंजूर करण्यासाठी साळुंखे व सिंधीहळ्ळ वस्ती, मुचंडी (ता. जत) येथील कन्नड शाळेचा शिक्षक सन्नोळी याने तीन महिन्यांच्या अर्जित रजेसाठी प्रत्येक महिन्याचे २० हजार याप्रमाणे ६० हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराने गुरुवार, दि. ६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अर्ज केला होता. या विभागाच्या पथकाने पडताळणी केली असता, त्यात सन्नोळी याने तक्रारदाराकडे ६० हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले होते. शुक्रवार, दि. १४ रोजी गटशिक्षणाधिकारी साळुंखे याने प्रत्येक महिन्याचे १५ हजार याप्रमाणे ४५ हजार रुपयांची मागणी करून एक महिन्याचे १५ हजार रुपये सन्नोळी याच्याकडे देण्यास सांगितले होते.
शुक्रवारी सिंधीहळ्ळ वस्ती (मुचंडी) शाळेत तक्रारदाराकडून १५ हजारांची लाच घेताना सन्नोळी यास रंगेहात पकडण्यात आले. यावेळी साळुंखे घरी चालला होता. त्यास उटगी येथील कळ्ळी वस्ती येथून ताब्यात घेण्यात आले. दोघांवर जत पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
लाचलुचपत प्रतिबंधकचे उपाधीक्षक सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, अविनाश सागर, सलीम मकानदार, सीमा माने, धनंजय खाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.