मांगले गटात मातब्बर इच्छुकांची कोंडी
By admin | Published: January 13, 2017 11:15 PM2017-01-13T23:15:59+5:302017-01-13T23:15:59+5:30
आरक्षणामुळे महिलाराज : उमेदवारांचा शोध सुरू; नाईक घराण्यातच संघर्ष होण्याचे संकेत
पी. एन. मोहरेकर ल्ल मांगले
पुनर्रचनेत शिराळा तालुक्यातील मांगले जिल्हा परिषद मतदारसंघ ओबीसी महिलेसाठी आरक्षित झाल्याने मातब्बरांची निराशा झाली आहे. राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या या गटातील मांगले गण मागासवर्गीय महिलेसाठी, तर सागाव गण खुल्या वर्गातील महिलांसाठी आरक्षित झाल्याने या गटात महिलाराज अवतरणार आहे. येथे राष्ट्रवादी व कॉँग्रेस आघाडी विरुध्द भाजप असा सामना असून, नाईक घराण्यातच संघर्षाचे संकेत मिळत आहेत.
मांगले जिल्हा परिषद गटाचे पंधरा वर्षांनंतर पुन्हा अस्तित्व निर्माण झाले असून, १५ गावांचा समावेश करण्यात आला आहे. सागाव गट रद्द करुन सागाव व मांगले गण निर्माण करण्यात आले आहेत. मांगलेत प्रथमच विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक व माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या चिखली गावाचा समावेश करण्यात आल्याने अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक होणार आहे. तिन्ही ठिकाणच्या महिला आरक्षणामुळे इच्छुक मातब्बरांची कोंडी झाली आहे. मात्र नाईक घराण्यातच लढत होणार असल्याचे संकेत आहेत.
शिराळा तालुक्यातील सर्वाधिक संवेदनशील जिल्हा परिषद गट अशी ओळख असलेल्या मांगलेतून मोरणा समूहाचे संस्थापक विलासराव पाटील, भैरवनाथ समूहाचे संस्थापक शंकरराव चरापले, अमरसिंह नाईक, डॉ. उषाताई दशवंत यांनी यापूर्वी प्रतिनिधीत्व केले आहे.
शिराळा नगरपालिका झाल्याने शिराळा गट रद्द होऊन मांगले गटाचे पुन्हा अस्तित्व निर्माण झाले आहे. सागाव गट व कांदे गण रद्द करुन मांगले गटात समावेश करण्यात आला आहे. मांगले गटात प्रथमपासूनच आजी-माजी आमदारांत काटा लढती झाल्या. यामध्ये १९९६-९७ च्या निवडणुकीत तत्कालीन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव चरापले यांच्याविरोधात स्वत:चे मतदान नसताना अमरसिंह नाईक यांना फत्तेसिंगराव नाईक यांनी उतरवून विजयश्री खेचून आणली होती. तेव्हापासून आजपर्यंत या गटावर विश्वास कारखाना गटाचे म्हणजेच राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे वर्चस्व आहे. मात्र मांगले गणात २००७ च्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते विलासराव पाटील यांना पराभूत करुन माजी उपसभापती प्रल्हाद पाटील यांच्यारुपाने प्रथमच आमदार शिवाजीराव नाईक यांनी शिरकाव केला होता. त्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या मांगलेवरही वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
शिवाजीराव नाईक यांना रोखण्यास युती
जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस स्वबळावर लढणार आहेत. मात्र गत निवडणुकीत व सध्याही जिल्ह्यात काहीही होवो, तालुक्यात मात्र आमदार शिवाजीराव नाईक यांना रोखण्यासाठी काँग्रेसचे सत्यजित देशमुख व राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक यांची युती आहे. या जोरावर त्यांनी पंचायत समितीवर आघाडीचा झेंडा फडकविला होता.
पुनर्रचनेत मांगले गटात १५ गावांचा समावेश करण्यात आला आहे.
मांगले गणात- मांगले, देववाडी, लादेवाडी, चिखलवाडी, फकीरवाडी, इंग्रुळ, कापरी, जांभळेवाडी या ८ गावांचा समावेश करण्यात आला आहे.
सागाव गणात - सागाव, कांदे, चिखली, नाटोली, भाटशिरगाव, भागाईवाडी, ढोलेवाडी या ७ गावांचा समावेश करण्यात आला आहे.