Sangli: ‘शक्तिपीठ’ रद्दसाठी शेतकऱ्यांनी आवळली वज्रमूठ, शासन धोरणाच्या प्रतीकात्मक पुतळ्याला दिली फाशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 16:19 IST2025-03-24T16:18:31+5:302025-03-24T16:19:58+5:30
.. तर अधिकाऱ्यांचे हातपाय मोडू !

Sangli: ‘शक्तिपीठ’ रद्दसाठी शेतकऱ्यांनी आवळली वज्रमूठ, शासन धोरणाच्या प्रतीकात्मक पुतळ्याला दिली फाशी
बुधगाव (जि.सांगली) : नागपूर ते गोवा हा प्रस्तावित ‘शक्तिपीठ’ महामार्ग रद्द करावा, या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी रविवारी कवलापूर (ता. मिरज) येथे शासनाच्या धोरणाचा निषेध करीत, शासन धोरणाच्या प्रतीकात्मक पुतळ्याला फाशी दिली. बाधित शेतामध्ये भगवे ध्वज फडकवत, हे ध्वज काढण्याचा कोणी प्रयत्न करू नये, असा इशाराही दिला.
प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग करण्यासाठी शासनाचा आग्रह कायम असतानाच, बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी शासनाचा हा मनसुबा उधळण्यासाठी विरोधाची वज्रमूठ पुन्हा एकदा घट्ट आवळण्यास सुरुवात केली आहे. शक्तिपीठ महामार्गबाधित शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून रविवारी कवलापुरात शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
...अन्यथा गाठ आम्हा शेतकऱ्यांशी
बाधित शेतामध्ये भगवे ध्वज फडकविले. ‘भगवा ध्वज हा छत्रपती शिवरायांचा ध्वज आहे. तोच भगवा आमचा प्राण आहे. तो आमच्या शेतातून काढण्याचा कोणी प्रयत्न करू नये, अन्यथा गाठ आम्हा शेतकऱ्यांशी आहे’ असा निर्वाणीचा इशारा या माध्यमातून देण्यात आला. शेतकरी कुटुंबांच्या मुळावर उठलेल्या या शासनाने हा महामार्ग त्वरित रद्द करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
.. तर अधिकाऱ्यांचे हातपाय मोडू !
शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी बळजबरीने कोणी अधिकारी शेतात आलेच तर प्रसंगी त्यांचे हातपाय मोडू, असा इशाराही यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी दिला.