आरोग्याधिकाऱ्यांच्या निलंबनाची सांगली महापौरांचीच मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 11:45 PM2018-11-30T23:45:19+5:302018-11-30T23:48:43+5:30
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभाराबद्दल आता खुद्द महापौर संगीता खोत व गटनेते युवराज बावडेकर यांनीच जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
सांगली : महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभाराबद्दल आता खुद्द महापौर संगीता खोत व गटनेते युवराज बावडेकर यांनीच जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. शुक्रवारी स्वच्छतेबाबत आयोजित बैठकीस आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे व डॉ. संजय कवठेकर यांनी दांडी मारल्याने दोन्ही पदाधिकारी चांगलेच संतप्त झाले. या दोन्ही अधिकाºयांना निलंबित करण्याची मागणीच त्यांनी केली.
आरोग्य विभागाच्या कारभारावर दररोज टीका होत आहे. विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महासभा, स्थायी समिती सभेत वारंवार आरोग्य विभागाच्या कामकाजाचा पंचनामा केला आहे. शहरात डेंग्यू, स्वाइन फ्लूने थैमान घातले आहे. डेंग्यूने आतापर्यंत ८ जणांचा बळी गेला आहे. औषध फवारणी ठप्प आहे. डासांचा उच्छाद सुरू आहे. त्यात ठिकठिकाणी कचºयाचे कंटेनर ओसंडून वाहत आहेत. दैनंदिन कचरा उठाव व स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. प्रशासकीय यंत्रणा प्रत्यक्षात जमिनीवर कुठेच दिसून येत नाही. केवळ कागदोपत्री कारभार सुरू आहे. कचरा उठाव, स्वच्छता या प्रश्नांवर महापौर खोत यांनी वारंवार बैठका घेऊन सूचना केल्या आहेत.
पण आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचाºयांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचेच दिसून येते. त्यामुळे महापौरांनी दर महिन्याला बैठक घेऊन आढावा घेण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानुसार नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आरोग्य विभागाची बैठक झाली. या बैठकीत सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाºयांनी स्वच्छतेबाबत सूचना केल्या होत्या. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी महापौर कार्यालयाकडून आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. संजय कवठेकर व डॉ. सुनील आंबोळे यांना २६ नोव्हेंबर रोजीच पत्र पाठविण्यात आले होते.
महापालिकेच्या आरसीएच कार्यालयातही बैठक होती. महापौर खोत या सकाळी सव्वादहा वाजता बैठकीसाठी आरसीएच कार्यालयात आल्या. पण तिथे ना अधिकारी होते, ना कर्मचारी. कार्यालयात डॉ. कवठेकर एकटेच बसून होते. महापौरांनी त्यांना बैठकीबाबत विचारता, त्यांच्या चेहºयावर प्रश्नचिन्ह आले. शनिवारी बैठक आहे, असे समजून त्यांनी काहीच तयारी केलेली नव्हती. आरोग्य विभागातील इतर कर्मचाºयांनाही निरोप दिला नव्हता. हा प्रकार पाहून महापौर खोत याही अवाक् झाल्या.
कवठेकर यांना महापौर कार्यालयाकडून पाठविलेले पत्र पाहण्यास सांगितले. त्यावर शुक्रवारी दहा वाजता बैठक असल्याचे नमूद होते. ते पाहून कवठेकर यांनी, आताच सर्व अधिकारी व कर्मचाºयांना निरोप देऊन बोलावितो, असे म्हणत महापौरांची माफी मागितली. दुसरीकडे कचरा उठाव व स्वच्छतेची जबाबदारी असलेले आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे हे तर कार्यालयाकडे फिरकलेच नव्हते. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही. या साºया प्रकाराने वैतागलेल्या महापौर खोत व गटनेते बावडेकर यांनी बैठक रद्द करून मुख्यालयाकडे प्रयाण केले. आरोग्य विभागाच्या या भोंगळ कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करीत दोन्ही अधिकाºयांचे निलंबन करण्याची मागणी आयुक्तांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्य विभागाला गांभीर्यच नाही : संगीता खोत
महापालिका क्षेत्रातील कचरा उठाव, स्वच्छतेबाबत दर महिन्याला आढावा बैठक घेण्याचे ठरले होते. गेल्या बैठकीतील सूचनांवर काय कारवाई झाली, याचा आढावा पुढील सभेत घेतला जाणार आहे. त्यानुसार २६ नोव्हेंबर रोजीच आरोग्याधिकाºयांना बैठकीचे पत्र दिले होते. पण दोन्ही आरोग्याधिकाºयांना बैठकीचे गांभीर्यच नसल्याचे दिसून आले. कचरा उठाव व स्वच्छतेच्या कामकाजाबाबत आपण स्वत:ही नाखूश आहोत. या विभागाला शिस्त लागावी, यासाठी दोन्ही अधिकाºयांच्या निलंबनाची मागणी आयुक्तांकडे करणार असल्याचे महापौर खोत यांनी सांगितले.