गणपतराव आबांच्या निधनाने चळवळीचा आधार हरपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:24 AM2021-08-01T04:24:46+5:302021-08-01T04:24:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : आमदार गणपतराव (आबा) देशमुख यांच्यासाठी सांगोल्यानंतर सांगली जिल्ह्याचा दुष्काळी भाग हीच कर्मभूमी ठरली होती. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : आमदार गणपतराव (आबा) देशमुख यांच्यासाठी सांगोल्यानंतर सांगली जिल्ह्याचा दुष्काळी भाग हीच कर्मभूमी ठरली होती. जिल्ह्याच्या दुष्काळी पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांचा लढा सदैव स्मरणात राहणारा आहे. त्यांच्या निधनाने सांगलीतील चळवळीचा आधार हरपला, अशी भावना व्यक्त होत आहे.
नागनाथअण्णा नायकवडी यांनी १९९३मध्ये आटपाडीत पहिली पाणी परिषद घेतली, तेव्हापासून प्रत्येक परिषदेत गणपतराव देशमुख यांचा सक्रिय सहभाग राहिला. परिषदेचे निमंत्रकपद शेवटपर्यंत त्यांच्याकडेच राहिले. दोन महिन्यांपूर्वी लॉकडाऊनमुळे ऑनलाइन परिषद झाली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे देशमुख सहभागी होऊ शकले नाहीत. त्यांच्या गैरहजेरीतील कदाचित ही एकमेव परिषद असावी.
दुष्काळी भागासाठी सिंचन योजना त्यांच्यासाठी नेहमीच जिव्हाळ्याचा विषय होता. पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक सिंचन योजनेचा लाभ सांगोला, मंगळवेढ्याला कसा होईल याकडे त्यांचे लक्ष असायचे. म्हैसाळ योजनेचे पाणी जतमध्ये पोहोचले, त्याचवेळी देशमुख यांच्यापर्यंत पाण्याचा सुगंध पोहोचला होता. कृष्णेचे पाणी आता सांगोला, मंगळवेढ्यासाठी दूर नाही हे लक्षात येताच त्यांनी तडक सांगली गाठली. वारणालीमध्ये कृष्णा खोरे महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. योजना मांडल्या. त्यांचे भगिरथ प्रयत्न यशस्वी झाले. सध्या म्हैसाळ योजनेचे पाणी सांगोला आणि मंगळवेढ्यातील काही गावांच्या शिवारात फिरत आहे. आबांची ही धावपळ कृष्णा खोरेच्या अधिकाऱ्यांसाठीही चकित करणारी ठरली होती.
कृष्णा खोरे महामंडळाची पहिली मागणीदेखील त्यांनीच नागजला पाणी परिषद घेऊन केली होती. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्यासोबत पाण्यासाठी दीर्घकाळ चळवळी केल्या. नागनाथअण्णा, निळू फुले, विचारवंत डॉ. बाबूराव गुरव, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्यासह अनेक पाणी परिषदा भरविल्या. त्यामुळेच टेंभू योजना खळाळली. आटपाडी परिसरात कवी नारायण सुमंत, साहित्यिक प्राचार्य सयाजीराव मोकाशी, कवी जयंत जाधव यांच्यासोबत ‘आम्ही शेतकरी साहित्य इर्जिक परिषदे’चे कार्यक्रमही त्यांच्या प्रेरणेने झाले.
कवठेएकंदच्या क्रांतीसिंह नाना पाटील वाचनालय व प्रबोधिनीने देशमुख यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविले होते. विट्यात २००३ मध्ये दुष्काळी शेतकऱ्यांनी तहसीलदार कचेरीसमोर जनावरे बांधून आंदोलन सुरू केले, तेव्हा एन. डी. पाटील, गणपतराव देशमुखांनी लढ्याला बळ दिले होते, त्या जोरावर तब्बल १०१ दिवस आंदोलन चालले. क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठाने त्यांना पुरस्काराने गौरविले होते. सांगली जिल्ह्यात डॉ. भारत पाटणकर, भगवानराव पाटील, भगवानराव सूर्यवंशी, वैभव नायकवडी, ॲड. सुभाष पाटील, धनाजी गुरव अशा अनेक सहकाऱ्यांच्या लढ्याला त्यांचे पाठबळ होते.
चौकट
विट्याशी वीण
सांगोला सूतगिरणीचे सूत विट्यातील यंत्रमागांसाठी यायचे. यानिमित्ताने येथील वीणकरांसोबत गणपतराव आबांची घट्ट वीण निर्माण झाली होती. खानापूर तालुक्यातील अनेक शेतकरी त्यांच्या सूतगिरणीचे सभासदही आहेत.