विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था करूनच इमारत पाडा, गांधी वसतिगृह बचाव समितीची मागणी
By अशोक डोंबाळे | Published: August 23, 2023 06:52 PM2023-08-23T18:52:54+5:302023-08-23T18:53:40+5:30
महात्मा गांधी वसतिगृहाच्या नवीन इमारतीसाठी निधी मंजूर करण्याची गरज
सांगली : महात्मा गांधी वसतिगृहाच्या नवीन इमारतीसाठी निधी मंजूर करण्याची गरज आहे. सध्या राहत असलेल्या विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था करून सध्याची इमारत पाडा, त्यास आमची हरकत नाही, अशी मागणी महात्मा गांधी वसतिगृह बचाव आजी-माजी विद्यार्थी कृती समितीतर्फे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे यांच्याकडे बुधवारी केली.
महात्मा गांधी वसतिगृहाची इमारत धोकादायक असल्याचे जिल्हा परिषदेने जाहीर केले आहे. यामुळे या वसतिगृहात सध्या राहत असलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. तसेच वीज, पाणी तोडण्याचा इशारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे यांनी दिला आहे. या निर्णयामुळे वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. त्याच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे सध्याच्या विद्यार्थ्यांची पर्यायी राहण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे. नूतन इमारतीचा आराखडा मंजूर करून घ्यावा, त्यासाठीची निविदा काढण्याची गरज आहे. नवीन इमारतीची निविदा काढल्यानंतरच जुनी इमारत पाडण्यात यावी, अन्यथा विद्यार्थ्यांसह आम्ही जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण करणार आहे, असा इशाराही आंदोलकांनी दिला.
यावेळी गांधी वसतिगृह बचाव कृती समितीचे महेश खराडे, ॲड. माणिक पांढरे, सागर चव्हाण, महादेव हिंगमिरे, कबीर मुलाणी, अजित हलिगले, गजानन मुळीक, स्वप्नील महाजन, इरराप्पा सरगर, मल्हारी माळी, प्रशांत व्हनमाने, समाधान पुजारी, गोविंद आर्गे, सलीम तांबोळी आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.
धोकादायक इमारतीत राहणे चुकीचे : तृप्ती धोडमिसे
महात्मा गांधी वसतिगृहाची इमारत धोकादायक असल्यामुळे त्या इमारतीमध्ये राहाणे चिंताजनक आहे. म्हणून धोकादायक इमारतीमध्ये विद्यार्थ्यांसह कुणीच राहू नये, अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिला आहे. शासनाकडे वसतिगृहाच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव पाठविला आहे. निधी मंजूर होताच निविदा काढून काम सुरू करण्यात येईल, असेही धोडमिसे यांनी सांगितले.