पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील कराडमध्ये उड्डाण पूल पाडण्याचे काम सुरू, वाहतूक कोलमडली; वाहनांच्या लांबच लांब रांगा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 12:46 PM2023-04-21T12:46:37+5:302023-04-21T12:47:00+5:30
ट्रॅफिक जाममध्ये फसलेल्या वाहनधारकांचे उकाड्याने प्रचंड हाल झाले.
मानाजी धुमाळ
रेठरे धरण : पुणे-बेंगळुरु या आशियाई राष्ट्रीय महामार्गावरील कृष्णा हॉस्पिटल समोरील उड्डाण पूल पाडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे पुण्याकडून कोल्हापुरकडे जाणारी वाहतूक आज, शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून कोलमडली. सुमारे चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून मेगा ब्लॉक झाला आहे. दररोजच वाहतूक कोंडी होत असून वाहनचालक प्रचंड संतापले आहेत.
ट्राफिक जाम व उन्हाच्या प्रचंड झळा बसून वाहन चालक कासावीस झाले आहेत. पुणे कडून बेंगळुरुच्या दिशेने जाणारी वाहने कृष्णा हॉस्पिटल उड्डाण पुलावरुन जात होती. परंतू हा पूल पाडण्याचे कामास सुरुवात कली असून, कृष्णा हॉस्पिटल समोर पूर्वेला असणाऱ्या कोल्हापूर कडे जाणाऱ्या चिंचोळ्या उपमार्गावरून वाहतूक सुरू आहे. या ठिकाणाहून सिंगल वाहने जात असल्याने छोट्या कार तसेच अवजड वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत. ट्रॅफिक जाममध्ये फसलेल्या वाहनधारकांचे उकाड्याने प्रचंड हाल झाले.
वोटन पुलाच्या पाठीमागे दुचाकी, एसटी बसेस, कार, ट्रक, कंटेंनर, महामार्गाच्या कामामुळे महामार्गावर अडकून पडले आहेत. येथील नवीन उड्डाण पुलाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु असून हे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागणार आहे.
महामार्गावरील दहा वाजल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी झाली आहे. यामुळे उपमार्गासह महामार्गावर सुमारे चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. याचा महामार्गावरून जाणाऱ्या वाहतूकदारांना व स्थानिकांना चांगलाच फटका बसला. पुण्याकडून कोल्हापूरकडे जाणाऱ्या कार कराड शहरात जाणाऱ्या जुन्या कोयना पुलावरून कराड मार्गे कार्वेनाका ते बैल बाजार ते मलकापूर या मार्गावरून कोल्हापुरच्या दिशेने जात आहेत.