जतला ‘तहसील’ची जुनी इमारत पाडण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:30 AM2021-08-12T04:30:35+5:302021-08-12T04:30:35+5:30
जत-मिरज मार्गावरील संस्थानिकांनी शंभर वर्षांपूर्वी खांडकी दगडाचा वापर करून बांधलेली तहसील कार्यालयाची दुमजली इमारत भुईसपाट करण्याचे काम ...
जत-मिरज मार्गावरील संस्थानिकांनी शंभर वर्षांपूर्वी खांडकी दगडाचा वापर करून बांधलेली तहसील कार्यालयाची दुमजली इमारत भुईसपाट करण्याचे काम जोरात सुरू झाले आहे. या संस्थानकालीन इमारतीने शंभर वर्षापासून अनेक ऐतिहासिक घटना पाहिल्या आहेत. इमारतीत तहसील कार्यालय, उपनिबंधक कार्यालय, उपकोषागार कार्यालय, पोलीस ठाणे अशी अनेक कार्यालये सुरू होती. कालांतराने उपकोषागार कार्यालय व पोलीस ठाणे त्यांच्या स्वत:च्या मालकीच्या जागेत सुरू झाली. सध्या या इमारतीत तहसीलदार कार्यालय, पुरवठा विभाग, रेकाॅर्ड विभाग, संजय गांधी निराधार, तालुका क्रीडा कार्यालय सुरू होती. पोलीस ठाण्याकडील कैदीही येथील कारागृहात ठेवण्यात येत होते. ही जुनी इमारत पाडण्याचे काम सुरू करण्यासाठी येथील सर्वच कार्यालये तहसीलदार कार्यालयासमोरील जत-मिरज रस्त्याच्या बाजूला असलेल्या सरकारी धान्य गोदामातील रिकाम्या जागेत तात्पुरती सुरू केली आहेत.
प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाला १२ कोटी ९३ लाख रुपये खर्चाची मान्यता मिळाली आहे. या जागेवर दुमजली इमारत होणार असून, ती दोन वर्षांत पूर्ण करण्याची जबाबदारी ठेकेदारावर आहे.
चौकट
जुन्या साहित्याचा निर्णय लवकरच
सध्या जुन्या इमारतीवरील कौले, पत्रे, तसेच लाकडी साहित्य काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. इमारतीचे जुने अवशेष तहसील कार्यालय परिसरात ठेवण्यात येऊन त्यानंतर त्याचे काय करायचे याचा निर्णय प्रशासन घेणार आहे.