गावोगावी मतदानाचे प्रात्यक्षिक दाखवून प्रबोधन, ही तर लोकसभेची तयारीच; निवडणुका लवकरच जाहीर होण्याचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 03:23 PM2024-01-18T15:23:01+5:302024-01-18T15:24:36+5:30

विकास शहा शिराळा : गावोगावी मतदान यंत्रे घेऊन अधिकारी वर्ग मतदानाचे प्रात्यक्षिक दाखवून प्रबोधन करत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची ...

Demonstration of village-to-village voting, signaling that Lok Sabha elections will be announced soon | गावोगावी मतदानाचे प्रात्यक्षिक दाखवून प्रबोधन, ही तर लोकसभेची तयारीच; निवडणुका लवकरच जाहीर होण्याचे संकेत

गावोगावी मतदानाचे प्रात्यक्षिक दाखवून प्रबोधन, ही तर लोकसभेची तयारीच; निवडणुका लवकरच जाहीर होण्याचे संकेत

विकास शहा

शिराळा : गावोगावी मतदान यंत्रे घेऊन अधिकारी वर्ग मतदानाचे प्रात्यक्षिक दाखवून प्रबोधन करत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी शासकीय पातळीवर वेगाने सुरू असल्याचे चित्र आहे. त्यातच मतदार यादीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

येत्या २२ जानेवारीस अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. शिराळा मतदारसंघातील मतदार यादीत एकसारखे फोटो असणारे २ हजार १९ तर एकसारखी नावे असणारे १ हजार ५५६ मतदारांची पडताळणी झाली आहे. नवीन मतदार नोंदणीसाठी प्रत्येक ग्रामपंचायत, नगरपंचायत स्तरावर मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी जन्मनोंदींची तपासणी केली.

यामध्ये अठरा वर्षे पूर्ण झालेल्या युवक, युवतींची माहिती घेतली. ज्यांनी अद्याप नोंदणी केली नाही त्यांच्याशी संपर्क करून मतदार नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. नवीन मतदार व ज्या मतदारांचे ओळखपत्र हरवले आहेत अशा १० हजार ८८४ पोस्टाने तर १ हजार २८४ ओळखपत्रे तलाठी यांच्यामार्फत मतदारांना पाठवली आहेत.

प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार शामला खोत पाटील, नायब तहसीलदार राजाराम शिंदे, नायब तहसीलदार हसन मुलाणी, नायब तहसीलदार राजेंद्र पाटील, शरीफ मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीची पूर्वतयारी सुरू आहे. क्षेत्रीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक, मतदार यादीमध्ये फोटोसह मतदार नोंद तपासणी, दुबार नोंद तपासणी, मयत मतदार तपासणी आदी कामे पूर्ण झाली आहेत. ८० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या नावांची पुन्हा एकदा पडताळणी करण्यात आली आहे.

यादी प्रसिद्ध होणार

येत्या २२ जानेवारीला अंतिम यादी तयार होऊन प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीमध्ये आपले नाव आहे का, याची सर्व मतदारांनी खात्री करावी. जर नावे नसतील तर नावे समाविष्ट करण्याबाबत सांगावे. १ एप्रिलपर्यंत पडताळणी करून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर पुरवणी अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे.

Web Title: Demonstration of village-to-village voting, signaling that Lok Sabha elections will be announced soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.