‘सांगली ब्रॅँडिंग’साठी प्रात्यक्षिक
By admin | Published: July 16, 2016 11:27 PM2016-07-16T23:27:18+5:302016-07-16T23:37:18+5:30
प्रकल्पाचे सादरीकरण : ‘लेसर शो’द्वारे झळकणार सांगलीचा इतिहास
सांगली : कृष्णाघाट पर्यटनस्थळ विकासाअंतर्गत लेसर शोच्या प्रकल्पाचे सादरीकरण शनिवारी सांगली महापालिकेच्या सभागृहात करण्यात आले. सांगली जिल्ह्याच्या विविध क्षेत्रातील इतिहासाचे पैलू या लेसर शोच्या माध्यमातून कृष्णा घाटावर झळकणार आहेत. महापालिकेच्या वसंतदादा पाटील सभागृहात प्रोजेक्टरद्वारे सादरीकरण करण्यात आले. यावेळी महापौर हारुण शिकलगार, जिल्हधिकारी शेखर गायकवाड, आयुक्त रवींद्र खेबूडकर, उपमहापौर विजय घाडगे, स्थायी समिती सभापती संतोष पाटील आदी उपस्थित होते. दोन वर्षापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी कृष्णा घाटावर लेसर शोसाठी जिल्हा नियोजन समितीमधून ५० लाख रुपये मंजूर करुन महापालिकेकडे वर्ग केले होते. स्थायी समितीचे तत्कालीन सभापती राजेश नाईक यांनी कृष्णा घाटावरील लेसर शोच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती. गेल्या दोन वर्षापासून ५० लाख रुपये पडून होते. प्रस्तावित कामाचा पाठपुरावा करुन याचे प्रत्यक्ष उद्घाटन करण्यात आले. कृष्णा घाटावरील वसंतदादा समाधी स्थळाजवळील जागेत हा प्रकल्प राबवला जाणार आहे. यासाठी प्रशासकीय मंजूरी मिळाल्यामुळे लवकरच कामकाजही सुरु होणार असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
यामुळे कृष्णा घाट पर्यटन स्थळ म्हणून नावारुपाला येऊन सांगली ब्रॅन्ड सिटी म्हणून ओळखली जाईल, यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असे ते म्हणाले. यावेळी सभागृह नेते किशोर जामदार, नगरसेवक उमेश पाटील, शेखर माने आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
महापालिका क्षेत्रात सात ठिकाणी खुल्या व्यायामशाळा
सांगली : महापालिका क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर सात ठिकाणी खुल्या व्यायामशाळा उभारण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासनाच्या ‘नावीन्यपूर्ण’ योजनेतून या व्यायामशाळांचा खर्च केला जाणार असल्याने त्याबाबतचा एक प्रस्ताव सॅनसन इंडस्ट्रीज् प्रा. लि. या कंपनीने शनिवारी महापालिकेकडे सादर केला. याबाबत महपाालिकेत धोरणात्मक निर्णय होणार आहे. सुरुवातीला सांगलीत ३, मिरज व कुपवाडला प्रत्येकी २ अशा एकूण सात खुल्या व्यायामशाळा उभारण्याचा प्रस्ताव आहे. यासंदर्भात महापौरांनी शनिवारी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला आयुक्त रवींद्र खेबूडकर, उपमहापौर विजय घाडगे, स्थायी समिती सभापती संतोष पाटील, विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, सभागृह नेते किशोर जामदार आदी उपस्थित होते. सुरुवातीला शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी या व्यायामशाळा उभारण्यात येणार आहेत. खुल्या व्यायामशाळा उभारताना महापालिकेला कोणताही खर्च करावा लागणार नाही. त्यामुळे प्रत्येक प्रभागात अशा व्यायामशाळा उभाराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केली. व्यायामशाळा कुठे आणि कोणत्या टप्प्यात किती उभारायच्या, याबाबतचा धोरणात्मक निर्णय येत्या महाभसेत घेण्याचा निर्णय झाला. नगरसेवक शेखर माने, उमेश पाटील, मैनुद्दीन बागवान, युवराज बावडेकर आदी नगरसेवक यावेळी उपस्थित होते.