सांगलीत भाजपकडून महाविकास आघाडीविरुद्ध निदर्शने, कंत्राटीकरणाच्या निर्णयाचा निषेध
By अविनाश कोळी | Published: October 21, 2023 01:11 PM2023-10-21T13:11:47+5:302023-10-21T13:14:09+5:30
विरोधकांचा डाव फसवा, विद्यार्थ्यांना दिला चकवा
सांगली : कंत्राटी नोकरभरतीचा निर्णय घेतल्याबद्दल तत्कालिन महाविकास आघाडीविरोधात सांगलीत भाजपने निदर्शने केली. राज्यातील युवकांची दिशाभूल केल्याबद्दल आघाडीच्या नेत्यांचा निषेधही व्यक्त करण्यात आला.
विश्रामबाग येथील भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेश खाडे व सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. ‘आपला नातू तुपाशी, दुसऱ्यांची पोरं उपाशी’, ‘विरोधकांचा डाव फसवा, विद्यार्थ्यांना दिला चकवा’, ‘नको खोटी भाषा, गुंडाळा शरद पवारांचा गाशा’, असे फलक झळकावत आघाडीतील नेत्यांचा निषेध करण्यात आला.
यावेळी शहराध्यक्ष प्रकाश ढंग म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंत्राटी भरतीच्या निर्णयावर सही केली होती. आता तीच कंत्राटी पद्धत देवेंद्र फडणवीस यांनी आणल्याचे सांगून सरकारला दोष देत आघाडीचे नेते नौटंकी करीत आहेत. कॉंग्रेसचे सुशील कुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी कंत्राटी पद्धतीने भरती केली. त्याचा पुरावा समोर आला आहे. कंत्राटी भरती हे कॉंग्रेसने केलेले पाप आहे. जनतेची दिशाभूल करणाऱ्या या नेत्यांचा आम्ही निषेध करतो. त्यांनी जनतेची माफी मागावी.
आंदोलनात माजी आमदार दिनकर पाटील, मकरंद देशपांडे, लोकसभा संयोजक दीपक शिंदे, पृथ्वीराज पवार, मोहन वनखंडे, प्रकाश बिरजे, श्रीकांत शिंदे, दीपक माने, स्वाती शिंदे, गीतांजली ढोपे-पाटील, राजेंद्र कुंभार, आदी उपस्थित होते.