समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची जिल्हा परिषदेसमोर निदर्शने, जिल्ह्यातील २८० डॉक्टरांचे कामबंद

By अशोक डोंबाळे | Published: January 16, 2023 05:09 PM2023-01-16T17:09:32+5:302023-01-16T17:09:55+5:30

महाराष्ट्रातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी सोमवारी विविध मागण्यांसाठी राज्यस्तरीय काम बंद आंदोलन केले आहे.

Demonstrations by Community Health Officers in front of Zilla Parishad, | समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची जिल्हा परिषदेसमोर निदर्शने, जिल्ह्यातील २८० डॉक्टरांचे कामबंद

समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची जिल्हा परिषदेसमोर निदर्शने, जिल्ह्यातील २८० डॉक्टरांचे कामबंद

googlenewsNext

सांगली : महाराष्ट्रातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी सोमवारी विविध मागण्यांसाठी राज्यस्तरीय काम बंद आंदोलन केले आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील २८० डॉक्टरांनी काम बंद आंदोलन करून जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली. महिना ४० हजार रुपये मानधनासह वार्षिक वेतनवाढीची डॉक्टरांनी मागणी केली आहे.

डॉ. समीर सनदी, डॉ. नूतन वाघमारे, डॉ. अजित माने, अनिल तेली, रोहित पाटील, धनश्री गोताड, प्रदीप अनुसे, शीतल चंदनशिवे, उज्ज्वल कुरणे, सचिन गायकवाड, आसिफ तांबोळी यांच्यासह जिल्ह्यातील २८० समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. तसेच जिल्हा परिषद प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले की, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे ४० हजार मानधनावर वार्षिक वेतनवाढ, अनुभव बोनस मिळावा, कामावर आधारित वेतन चार हजार रुपये करावे, समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या बदलीसंदर्भात धोरण निश्चित करावे, २३ इंडिकेटरचे कामावर आधारित मोबदला रद्द मिळावा, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बढती मिळावी, प्रवास भत्त्यासह अन्य भत्ते शासकीय नियमानुसार मिळावेत, आदी मागण्यांसाठी डॉक्टरांनी आंदोलन केले. प्रशासनाच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाही डॉक्टरांनी दिल्या.

२३ जानेवारीपासून बेमुदत संपावर

शांततेच्या मार्गाने आंदोलन करूनही डॉक्टरांच्या मागण्यांकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. आजच्या आंदोलनाची दखल सरकारने घेतली नाही तर दि. २३ जानेवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा जिल्ह्यातील सर्व समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी घेतला आहे.

डॉक्टरांचे प्रश्न शासनस्तरावरील : दिलीप माने

जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकारी यांचे सर्व प्रश्न हे शासनस्तरावरील आहेत. आंदोलनातील डॉक्टरांच्या मागण्यांचे निवेदन तातडीने राज्य शासनाकडे पाठविले आहेत. शासनाकडूनच तो प्रश्न सोडविला पाहिजे, यासाठी प्रयत्न चालू आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी दिली.

आरोग्य सेवेवर परिणाम

जिल्ह्यातील २८० डॉक्टर सोमवारी संपावर गेल्यामुळे आरोग्य केंद्र, उपकेंद्रातील आरोग्य सेवेवर परिणाम झाला होता. काही शासकीय वैद्यकीय अधिकारी सेवेत असल्यामुळे तेथील आरोग्य सेवा सुरळीत चालू होती.

Web Title: Demonstrations by Community Health Officers in front of Zilla Parishad,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली